रत्नागिरीत खुनी हल्ल्यात तरुण गंभीर
By admin | Published: April 23, 2017 11:43 PM2017-04-23T23:43:35+5:302017-04-23T23:43:35+5:30
एकाला अटक; वादातून हल्ला झाल्याचा अंदाज
रत्नागिरी : तीन महिन्यांपासून आपापसांत चाललेल्या वादातून शनिवारी रात्री तीन बुरखाधारी व्यक्तींनी केलेल्या प्राणघातक हल्लयात सिद्धेश लक्ष्मीकांत मालगुंडकर हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी नीलेश महादेव आखाडे याला ताब्यात घेतले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी; सिद्धेश मालगुंडकर (वय २५, रा. खेर संकुल, रत्नागिरी) याचे बाजारपेठेमध्ये दुकान आहे. शनिवारी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून तो दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाला. टिळक आळीतील खेर संकुलाजवळ आला असता तीन बुरखाधारी व्यक्तींनी धारदार हत्याराने त्याच्यावर हल्ला केला. त्यांनी त्याच्या पाठीवर, छातीवर, हातावर असे १३ वार केले. जीव वाचविण्यासाठी त्याने आरडाओरडा केला. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी त्यांच्या दिशेने धाव घेतली. यावेळी तिन्ही बुरखाधारींनी तेथून पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सिद्धेशला नागरिकांनी तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू असून, त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुशांत वराळे घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पोलिसांनी तासाभरातच नीलेश आखाडे (२५, रा. विश्वनगर, रत्नागिरी) याला ताब्यात घेतले. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली. (वार्ताहर)
मित्राला त्रास देऊ नको
हल्लेखोर तरुणांनी वार करतानाच अन्य एका तरुणाचे नाव घेऊन आमच्या मित्राला त्रास देऊ नको, असे उद्गार काढल्याची चर्चा आहे. तशी प्राथमिक माहिती मिळाल्यामुळेच पोलिस एका आरोपीपर्यंत तत्काळ पोहोचू शकले. आता उर्वरित दोघांनाही लवकरच ताब्यात घेण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.