पोफळीत शिकारीला गेलेला तरुण बंदुकीच्या गोळीने ठार
By admin | Published: March 20, 2017 11:11 PM2017-03-20T23:11:05+5:302017-03-20T23:11:05+5:30
पोफळीत शिकारीला गेलेला तरुण बंदुकीच्या गोळीने ठार
शिरगांव / चिपळूण : शिकारीसाठी गेलेला तरुण स्वत:च्याच बंदुकीतील गोळीने ठार झाल्याची घटना पोफळी टीआरटी येथे जुन्या सोनपात्र मंदिराजवळ असणाऱ्या आंबा, काजूच्या बागेत घडली. नीतीराज धोंडिराम ऊर्फ बावा बडदे असे या तरुणाचे नाव आहे. हातातून बंदूक खाली पडून त्यातून उडालेल्या दोन गोळ्यांपैकी एका गोळीने त्याचा जीव घेतला. रविवारी रात्री घडलेली ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.
रविवारी रात्री बावा बडदे (वय ३३, रा. होडेवाडी-पोफळी) आपल्या अॅपे रिक्षाने टीआरटी रोड येथील कच्च्या रस्त्याने गेला. रात्रभर तो घरी परत आला नाही. म्हणून सोमवारी सकाळी त्याचा भाऊ संजय बडदे याने त्याचा शोध सुरू केला. बावाची अॅपेरिक्षा त्याला टीआरटी रोडवर आढळली. तेथून पुढे गेले असता यशवंत मानकर यांच्या आंबा, काजूच्या बागेत आंब्याच्या झाडावर चार ते साडे चार फूट उंचीच्या अंतरावर असलेल्या लाकडी फळ्यांच्या माचीच्या खाली बावाचा मृतदेह त्याला दिसला. मृतदेहाशेजारी गावठी बंदूक व जेवणाचा डबा, पाण्याची बाटली होती.
हे दृश्य पाहून संजयने स्थानिक ग्रामस्थांना याची माहिती दिली व तत्काळ पोलिसांना बोलाविण्यात आले. सहा. पोलिस निरीक्षक प्रदीप पाटील आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी आले. बावाच्या उजव्या बाजूच्या बरगडीत गोळी घुसून ती डाव्या बाजूच्या खांद्याजवळून बाहेर पडली होती, तर दुसरी गोळी माचीच्या फळीतून आंब्याच्या फांदीला चाटून गेली होती. मृतदेहावर अन्य कसल्याही जखमा दिसल्या नाहीत. त्यामुळे त्याला डुलकी लागून बंदूक खाली पडली असावी व त्यातून गोळी उडून ती लागली असावी, असा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.
बंदुकीच्या गोळीने मृत्यू झाल्यामुळे मृतदेहाची फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणी होणे गरजेचे असल्याने मृतदेह रत्नागिरी येथे शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला. या प्रकरणी शिरगाव पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास सहा. पोलिस निरीक्षक पाटील करीत आहेत. पंचायत समिती सदस्य विश्वनाथ ऊर्फ बाबू साळवी व डॉ. शिवाजी मानकर यांच्यासह अनेकांनी बडदे कुटुंबीयांचे सांत्वन केले. (वार्ताहर)