प्रवासात धबधबा पाहून मित्रांनी कार थांबवली, अंघोळीला गेले, धमाल केली; पण अचानक प्रवाह वाढला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 09:36 PM2022-07-26T21:36:46+5:302022-07-26T21:42:12+5:30
भुईबावडा घाटातील धबधब्याच्या प्रवाहाने नाल्यातून दरीत कोसळून सांगली कापडपेठ भागातील रोहन यशवंत चव्हाण(28) या तरुणाचा मृत्यू झाला.
प्रकाश काळे
वैभववाडी:
भुईबावडा घाटातील धबधब्याच्या प्रवाहाने नाल्यातून दरीत कोसळून सांगली कापडपेठ भागातील रोहन यशवंत चव्हाण(28) या तरुणाचा मृत्यू झाला. ही दुर्घटना मंगळवारी(ता.२६) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. मृतदेह दरीतून बाहेर काढण्याची मोहीम पोलीस आणि सह्याद्री जीवरक्षक पथकामार्फत रात्री उशिरापर्यंत सुरु होती.
सांगली कापडपेठ भागातील नऊ तरुण दोन गाड्यांमधून वेंगसर येथील धनजंय बेलवलकर यांच्या घरी निघाले होते. यामध्ये कौतुक नागवेकर, प्रवीण निमगुंडा पाटील, उमेश सुतार, रमेश सुतार, प्रशांत बाडवणे, प्रकाश सुतार, धनजंय बेलवकर, उदय बेलवलकर,आणि रोहन चव्हाण यांचा समावेश होता.
सकाळी नऊच्या सुमारास हे सर्व सांगलीहून वेंगसरच्या दिशेने निघाले होते. सायंकळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हे भुईबावडा घाटात पोहोचले. भुईबावडा घाटातील धबधबा पाहून त्यांना राहवले नाही. ते सर्वजण धबधब्यामध्ये आंघोळीला उतरले. त्याचवेळी घाट परिसरात जोरदार पाऊस झाल्याने धबधब्याचा प्रवाह वाढला. त्यामुळे सगळे धबधब्यातून बाहेर आले. मात्र इतर सहकाऱ्यांना रोहन कुठेही दिसला नाही. त्यामुळे त्यांनी शोधण्यास सुरु केली. परंतु कुठेच न दिसल्यामुळे त्यांनी गगनबावडा पोलीसांना ही माहीती दिली.
गगनबावडा पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली तेव्हा त्यांना १०० फुट खोल दरीत रोहनचा मृतदेह नजरेस पडला. त्यामुळे गगनबावडा पोलीसांनी वैभववाडी पोलीसांना कळविले. त्यानंतर पोलीस निरीक्षक अमित यादव, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई, पोलीस उपनिरीक्षक सूरज पाटील, अभिजीत तावडे, विलास राठोड, पडेलकर आदी पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दरीत कोसळलेला मृतदेह बाहेर काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले.
परंतु काळोख आणि खोल दरी यामुळे त्यांनी करुळ येथील सह्याद्री जीवरक्षक पथकाला पाचारण केले. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हे पथक भुईबावडा घाटात पोहोचले. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्याच्या मोहीमेला सुरवात झाली. साडेआठ वाजेपर्यत मृतदेह बाहेर काढण्यात पोलीसांना यश आले नव्हते.
मोरीच्या नाल्यातून घसरला असण्याची शक्यता
धबधब्याच्या प्रवाहाचा निचरा मोरीच्या नाल्यातून होतो. सततच्या पावसामुळे मोरीचे नाले शेवाळामुळे निसरडे झालेले आहेत. त्यामुळे या नाल्यातूनच रोहन चव्हाण हा दरीत कोसळला असण्याची शक्यता आहे.