तरूणांनी वाचवला वायरमनचा जीव
By Admin | Published: October 19, 2015 10:46 PM2015-10-19T22:46:06+5:302015-10-19T23:49:18+5:30
असिम साल्हे व रियाज ठाकूर यांनी प्रसंगावधान बाळगून लाकडी बांबूने त्या कर्मचाऱ्याचे हात तारेपासून बाजूला केले
शृंगारतळी : गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे महावितरणाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. विजेचा धक्का लागून महावितरणाचाच कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. येथील तरुणांनी प्रसंगावधान राखून त्या कर्मचाऱ्याचा जीव वाचवण्यात यश मिळवले. त्याला उपचारासाठी चिपळूण येथे हलविण्यात आले आहे. शृंगारतळी येथील सर्वरी प्लाझा इमारतीजवळील सिमेंटच्या पोलवर विजेच्या कामासाठी महावितरणचा कर्मचारी किरण बारगुडे हा चढला होता. विद्युत खांबावरील चालू स्थितीत असलेल्या वाहिनीला हात लागल्याने तो तारेला चिकटल्याचे येथील ग्रामस्थांच्या नजरेस पडले. असिम साल्हे व रियाज ठाकूर यांनी प्रसंगावधान बाळगून लाकडी बांबूने त्या कर्मचाऱ्याचे हात तारेपासून बाजूला केले. त्याला वाचवण्यासाठी जवळच उभा असलेला टेम्पो खांबाजवळ घेऊन नागरिकांनी या कर्मचाऱ्याला अलगद खाली उतरवले. त्याला चिखली आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, याठिकाणी डॉक्टर व कर्मचारी जागेवर नव्हते. त्याला वाचवण्यासाठी इम्तियाज धामस्कर, इम्रान घारे, डॉ. धानूरकर, डॉ. आठवले, ईस्हाक साल्हे, अशोक सोलकर यांनी प्रयत्न केले. (वार्ताहर)