तरूणांनी आधुनिकतेची कास धरावी
By admin | Published: December 24, 2015 10:08 PM2015-12-24T22:08:57+5:302015-12-25T00:09:15+5:30
नारायण राणे : वागदे येथील कृषी प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन, ३00 स्टॉल्सचा समावेश
कणकवली : प्रदर्शनात दिसणारे पशुधन आपल्याकडे असले पाहिजे यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत. निसर्गाने या जिल्ह्याला भरभरुन दिले आहे. मात्र, तरीसुद्धा येथील पडिक जमिनीचे प्रमाण वाढत आहे. हे योग्य नव्हे. तरुणानी आधुनिकतेची कास धरित शेती तसेच बागायतीकडे वळावे. त्याचप्रमाणे आर्थिकदृष्ट्या सबळ व्हावे. जिल्हा परिषदेचे वार्षिक बजेट कमी असतानाही हा महोत्सव आयोजित करून येथील जनतेला दिशा देण्याचे काम केले आहे. ते स्तुत्य आहे. या ज्ञानाचा उपयोग करून घ्या असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.वागदे येथील पशु, पक्षी राज्यस्तरीय प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी राणे मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी आमदार नीतेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, सर्व विषय समिती सभापती उपस्थित होते. यावेळी बोलताना सतीश सावंत म्हणाले, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता प्राप्त व्हावी यासाठी जिल्हा परिषद तसेच सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत. या एकत्रित कामाला यश मिळत आहे. जिल्ह्यात ऊस उत्पादन वाढावे यासाठी आम्ही केलेल्या प्रयत्नामुळे सन २0१५ मध्ये १ लाख टनाच्या वर ऊस उत्पादन पोहचले आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २६ कोटी रुपये मिळणार आहेत. येथील पडिक जमीन कमी करण्यासाठी आमचे प्रयत्न असून त्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या प्रदर्शनामागचा हेतूही तोच असल्याचे सतीश सावंत यांनी सांगितले.
संदेश सावंत म्हणाले, जिल्हा परिषदेच्या विविध पदांच्या माध्यमातून नारायण राणे यांनी आमच्यावर जी जबाबदारी दिली आहे. ती निच्छितच चांगल्याप्रकारे पार पाडण्याचा आम्ही प्रयत्न करु. तसेच त्यांचा विश्वास सार्थकी लावू, असे सांगितले.
या महोत्सवाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात ७८८ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ९९ रुग्णांवर अधिक उपचारांची गरज आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या रुग्णावर उपचार केले जातील.
शेखर सिंह म्हणाले, या जिल्ह्याला निसर्गाची साथ लाभली आहे. त्याचा उपयोग करून घेता आला पाहिजे. प्रदर्शनातून जी माहिती शेतकऱ्यांना समजेल तिचा उपयोग करून शेतीबरोबरच दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी त्यानी प्रयत्न करावेत. आणि आपला उत्कर्ष साधावा.
प्रास्ताविक रणजीत देसाई यांनी केले. ते म्हणाले, गतवर्षी अशाच प्रकारचा महोत्सव घेतल्यानंतर जिल्ह्यात ६0 हजार लिटर दूध संकलन होत आहे. पुढील महोत्सवापर्यंत ते ८0 ते ९0 हजार लीटरपर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. स्वयंरोजगार वाढावा यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. शेतकऱ्यांसाठी तसेच पशुपालकांसाठी वर्षभर विविध उपक्रम राबविण्याचा मानस असून त्यांच्या उन्नत्तीसाठीच हे करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
सूत्रसंचालन प्रफुल्ल वालावलकर, शाम सावंत, राजेश कदम यांनी केले. या उद्घाटन सोहळ्याच्यावेळी कृषि विषयक माहिती पुस्तिका प्रकाशन नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात
आले. (वार्ताहर)
ही तर जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्ती : नीतेश राणे
शेतकऱ्यांसमोर मोठी आव्हाने आहेत. वातावरणातील बदल शेतीवर परिणाम करतात. त्यामुळे बदलत्या वातावरणाचा अभ्यास करून शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आधुनिक शेतीकडे वळावे.
शेतकऱ्यांनी आता कोणावरच अवलंबून न रहाता स्वावलंबी बनायला पाहिजे. राज्याला विकसित करण्यााठी शेती हाच मुख्य पर्याय आहे. यावर्षी मोजक्याच शेतकऱ्यांचा सत्कार झाला.
मात्र पुढील वर्षी अनेक प्रगतशील शेतकरी तयार झाले पाहिजेत. त्यांचा सत्कारही आम्हाला करता आला पाहिजे. शेतकऱ्यांना दिशा देण्याचे काम अशा प्रदर्शनातून झाले पाहिजे.
नारायण राणे यांच्या माध्यमातून जनतेला दिलेली आश्वासने आम्ही पूर्ण करीत आहोत. जिल्हा परीषदेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेले हे प्रदर्शन हा त्यातलाच भाग आहे. असे नीतेश राणे म्हणाले.
केंद्र शासनाने अनेक राज्यांसाठी पॅकेज जाहिर केले. मात्र महाराष्ट्राचा त्यात समावेश नाही. राज्य शासनाने शेतकऱ्यासाठी जाहिर केलेल्या पॅकेज पैकी पैसे शेतकऱ्यांना मिळालेलेच नाहीत.
आत्महत्या होत असूनही शासनाला शेतकऱ्यांबाबत काही वाटत नाही. त्यामुळे आता विचार करण्याची वेळ आली आहे. लोकप्रतिनिधींकडून फसविण्याचे काम होत असेल तर जनतेने अशा लोकांना माफ करता नये, असेही नीतेश राणे म्हणाले.