Sindhudurg: अस्वलाच्या हल्ल्यात युवक गंभीर, मांगेली तळेवाडी येथील घटना

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: June 19, 2024 06:33 PM2024-06-19T18:33:09+5:302024-06-19T18:33:31+5:30

शिकाऱ्याचीच शिकार झाल्याची दबक्या आवाजात चर्चा

Youth critical in bear attack, Incident at Mangeli Talewadi Sindhudurg | Sindhudurg: अस्वलाच्या हल्ल्यात युवक गंभीर, मांगेली तळेवाडी येथील घटना

Sindhudurg: अस्वलाच्या हल्ल्यात युवक गंभीर, मांगेली तळेवाडी येथील घटना

वैभव साळकर

दोडामार्ग : मांगेली तळेवाडी येथे मंगळवारी रात्री अस्वलाने केलेल्या हल्ल्यात सुरेश अर्जुन गवस (३२) हा युवक गंभीर जखमी झाला. त्याचा उजवा हात जायबंदी झाला तर डोक्याला व तोंडालाही गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर बांबोळी गोवा येथे सध्या उपचार सुरू आहेत. अस्वलाने हल्ला केल्याची ही तालुक्यातील पहिलीच वेळ असून, त्यामुळे मांगेली परिसरात खळबळ उडाली आहे.

दोडामार्ग तालुक्यात रानटी हत्ती, गवे यांच्या हल्ल्यात यापूर्वी अनेकदा शेतकरी जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, आता अस्वलांचादेखील तालुक्यात शिरकाव झाला आहे. मांगेली गावच्या वेशीला लागूनच कर्नाटक राज्याची हद्द सुरू होते. त्याला लागूनच सडा, चोरले, मान आदी गावांच्या सीमा आहेत. या ठिकाणी घनदाट जंगल आहे जे कर्नाटक वनविभागाच्या अखत्यारीत येते. याच घनदाट जंगलात अस्वलांचे अस्तित्व आहे. तेथूनच हे अस्वल खाली मांगेली गावात उतरले असल्याची शक्यता आहे.

सुरेश गवस यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते रात्रौ आपल्या काजूकलमांच्या बागेची राखण करण्यासाठी गेले होते. गवे येत असल्याने त्यांना हाकलण्यासाठी आपण गेलो होतो आणि याचदरम्यान अस्वलाने आपल्यावर हल्ला चढविला. मात्र, आपण हल्ल्याला निकराचा प्रतिकार केल्याने अस्वलाने जंगलात पळ काढला. केवळ दैव बलवत्तर म्हणून आपण बचावलो, असे त्यांनी सांगितले. मात्र, याबाबत उलटसुलट चर्चा रंगली असून, काजूचा हंगाम नसताना रात्रीच्या वेळी बागेत जाण्याचे कारण काय? यापाठीमागे शिकार किंवा अन्य काही कारण आहे का? यादृष्टीनेही वनविभागाचे अधिकारी तपास करणार असून, त्याला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

शिकाऱ्याचीच झाली शिकार?

मांगेलीत घडलेली ही घटना म्हणजे जंगलात गेलेल्या शिकाऱ्याचीच शिकार होण्याचा प्रकार असल्याची चर्चा मांगेलीतच दबक्या आवाजात सुरू आहे. मांगेलीत मोठ्या प्रमाणात जंगली प्राण्यांची शिकार होते. अनेकदा शिकारीचे प्रकार उघडही झाले आहेत. काहींचा तर तो एक धंदाच बनला आहे. काही स्थनिकांचाही त्यात सहभाग असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे आहे. त्यामुळे या अस्वल हल्ल्यामागे शिकारीची पार्श्वभूमी तर नाही ना? आणि अस्वलाने हल्ला केला तेव्हा गवस यांच्यासोबत आणखीन कोणी होते का? या अनुषंगाने हे वनाधिकारी तपास करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Youth critical in bear attack, Incident at Mangeli Talewadi Sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.