कार-दुचाकी अपघातात बांद्यातील युवक ठार
By Admin | Published: December 29, 2016 12:06 AM2016-12-29T00:06:22+5:302016-12-29T00:06:22+5:30
इंजिनिअर होण्याचे स्वप्न अपूर्णच....!
बांदा : मुंबई-गोवा महामार्गावर सटमटवाडी येथे कार व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात जखमी झालेला युवक युवराज विवेक सावंत (वय २०) याचे मंगळवारी रात्री उशिरा गोवा-बांबुळी येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.
सटमटवाडी येथे गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कारने युवराजच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने युवराज रस्त्यावर फेकला गेला होता. त्याच्या पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याला उपचारांसाठी गोवा-बांबुळी येथील रुग्णालयात हलविले होते. मंगळवारी रात्री उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. त्याच्या पश्चात आई-वडील, बहीण असा परिवार आहे. त्याच्यावर बुधवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
युवराज हा एकुलता एक असल्याने त्याला इंजिनिअर बनविण्यासाठी त्याच्या आई-वडिलांनी खूप मेहनत घेतली होती. त्याची आई पिग्मी गोळा करून शिक्षणासाठी कष्ट घेत होती. (प्रतिनिधी)