पुण्यातील युवकाला कारने चिरडले
By admin | Published: December 30, 2016 11:45 PM2016-12-30T23:45:08+5:302016-12-30T23:45:08+5:30
पर्यटकांचा अतिउत्साहीपणा अंगलट : युवक गंभीर, मालवण दांडी येथील घटना
मालवण : नाताळाच्या सुटीत मालवणात पर्यटनासाठी आलेल्या पुणे येथील पर्यटकांना समुद्रात गाडी चालविणे चांगलेच अंगलट आले. स्कॉर्पिओ गाडीच्या दर्शनी भागावर (बॉनेट) बसून आनंद लुटत असताना तोल जाऊन समुद्रात फेकल्या गेलेल्या अनिकेत महेश बारजेस (वय २६, रा. बालेवाडी, पुणे) या युवकाला त्याच्या कारच्या मागोमाग असलेल्या एका कारने चिरडले. यात अनिकेत याच्या दोन्ही पायांना व हाताला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी दांडी किनाऱ्यावर घडली.
गंभीर जखमी झालेल्या अनिकेत याला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला अधिक उपचारासाठी रात्री पुणे येथे हलविण्यात आल्याचे समजते. या अपघाताची नोंद पोलिस ठाण्यात झाली नव्हती.
पुणे येथील पर्यटकांच्या दोन गाड्या मालवण दांडी येथे पर्यटनासाठी आल्या होत्या. यावेळी दोन्ही गाडीतील युवकांनी दांडी किनाऱ्यावर चारचाकीमधून रपेट मारण्याचा निर्णय घेतला. स्कॉर्पिओ गाडी व मारुती सुझुकी गाडी समुद्राच्या पाण्यात उतरवून आनंद लुटण्यास पुण्यातील पर्यटकांनी सुरुवात केली. यावेळी
पुढे असलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील
अनिकेत हा गाडीच्या दर्शनी भागावर बसून पाण्याच्या कारंज्याचा आनंद लुटत
असताना त्याचा तोल जाऊन हा अपघात घडला. (प्रतिनिधी)
काही क्षणात दुसऱ्या कारने चिरडले
अनिकेतचा समुद्रात तोल गेल्यानंतर स्कॉर्पिओच्या मागोमाग असलेली त्यांच्याच सहकाऱ्यांची मारुती सुझुकी अनिकेतच्या हात व पायावरून गेली. या अपघातात अनिकेत गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले. एकूणच पर्यटकांचा अतिउत्साहीपणा चांगलाच अंगलट आला.