सरंबळ येथील युवकाला अत्याचारप्रकरणी सश्रम कारावासाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 04:20 PM2020-03-07T16:20:48+5:302020-03-07T16:22:38+5:30
लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करीत एका खासगी रुग्णालयात जबरदस्तीने गर्भपात घडवून आणल्याप्रकरणी गुन्हा नोंद असलेल्या प्रज्योत प्रदीप नाईक (२५, रा. सरंबळ देऊळवाडी) याला जिल्हा विशेष न्यायाधीश आर. बी. रोटे यांनी दोषी ठरविले आहे. १० वर्षे सश्रम कारावास व पीडित मुलीला देण्यासाठी १० हजार रुपये दंड ठोठावला आहे.
सिंधुदुर्गनगरी : लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करीत एका खासगी रुग्णालयात जबरदस्तीने गर्भपात घडवून आणल्याप्रकरणी गुन्हा नोंद असलेल्या प्रज्योत प्रदीप नाईक (२५, रा. सरंबळ देऊळवाडी) याला जिल्हा विशेष न्यायाधीश आर. बी. रोटे यांनी दोषी ठरविले आहे. १० वर्षे सश्रम कारावास व पीडित मुलीला देण्यासाठी १० हजार रुपये दंड ठोठावला आहे.
पीडित मुलगी आपल्या मावस भावासोबत गेली असता आरोपी व तिची ओळख झाली. त्यानंतर या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. यानंतर प्रज्योत याने तिला लग्नाचे आमिष दाखवित एप्रिल २०१६ ते जानेवारी २०१९ या कालावधीत विविध ठिकाणी तिच्यावर अत्याचार केले. डिसेंबर २०१६ मध्ये तिचा जबरदस्ती गर्भपातही करून घेतला.
याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीनुसार प्रज्योत याच्यावर तसेच त्याला गर्भपात करण्यासाठी सहकार्य केल्याप्रकरणी सावंतवाडी येथील एका डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी प्रज्योत याच्यावर २७ मार्च २०१९ रोजी गुन्हा दाखल केला होता. २८ रोजी त्याला अटक केली होती. त्यानंतर त्याला १ एप्रिलपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती.
त्यानंतर त्याला ७ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर तो जामिनावर मुक्त होता. याची सुनावणी जिल्हा विशेष न्यायालयात पूर्ण झाली असून याप्रकरणी न्यायालयाने त्याला दोषी ठरविले आहे. यावेळी एकूण सहा जणांची साक्ष घेण्यात आली. यात पीडित मुलगी व गर्भपात करणाऱ्या डॉक्टरची साक्ष महत्त्वाची ठरली.
यावेळी सरकारी पक्षाच्या वकिलांनी अत्याचार झाला त्यावेळी पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणले. यामुळे न्यायालयाने साक्षी पुराव्याच्या जोरावर प्रज्योत याला दोषी ठरविले. तपासिक अंमलदार म्हणून महिला पोलीस उपनिरीक्षक गायत्री पाटील यांनी काम पाहिले होते.
भादवि कलम ३७६ (३), (१२) नुसार आरोपीला निर्दोष सोडले. तर ३७६ (१), (२) व अल्पवयीन बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ३, ४, ५, ६ नुसार दोषी ठरवत १० वर्षे सश्रम कारावास आणि पीडित मुलीला देण्यासाठी १० हजार रुपये दंड ठोठावला.
भादवि कलम ४१७ नुसार सहा महिने सश्रम कारावास व ५१६ अंतर्गत १ वर्ष कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा एकत्रित भोगावयाची असल्याने १० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड ही एकत्रित शिक्षा सुनावली आहे. प्रज्योत याने सुरुवातीला भोगलेली शिक्षा कमी केली आहे. सरकारी पक्षाच्यावतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता रूपेश देसाई यांनी काम पाहिले.