युवकांनो पंचायत राज बळकट करा : मुक्ता दाभोलकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 10:14 AM2020-01-09T10:14:03+5:302020-01-09T10:17:32+5:30
युवावर्गाने पंचायत राज व्यवस्थेत सहभागी होण्यासाठी अभ्यासपूर्ण पुढाकार घेऊन नेतृत्व गुणांचा विकास करण्यासाठी पुढाकार घेण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन अॅड. मुक्ता दाभोलकर यांनी केले.
कणकवली : युवावर्गाने पंचायत राज व्यवस्थेत सहभागी होण्यासाठी अभ्यासपूर्ण पुढाकार घेऊन नेतृत्व गुणांचा विकास करण्यासाठी पुढाकार घेण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन अॅड. मुक्ता दाभोलकर यांनी केले.
ह्यपंचायत राज व्यवस्थेतील युवा नेतृत्वगुण विकास संधीह्ण या विषयावर मुंबई येथील डॉ. पी. व्ही.मंडलिक ट्रस्टच्यावतीने व कणकवली महाविद्यालयाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग व ग्रामीण विकास विभागाच्या सहकार्याने आयोजित कार्यशाळेत युवकांशी त्यांनी संवाद साधला.
अॅड. दाभोलकर पुढे म्हणाल्या, युवकांनी ग्रामसभेला उपस्थित रहायला हवे. तसेच शासनाच्या योजना समजावून घ्यायला हव्यात. गावाच्या विकास आराखड्यासंदर्भात माहिती करून घ्यायला हवी.
या कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजीराव शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. डॉ. शिंदे यांनीही युवकांनी विकास प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
यावेळी मंडलिक ट्रस्टच्या सचिव साधना वैराळे, अल्लाउद्दीन शेख, कार्यकर्ते हरिहर वाटवे, अर्पिता मुंबरकर, विभागप्रमुख डॉ. राजेंद्र मुंबरकर, प्रा. सत्यवान राणे आदी मान्यवर उपस्थित होते. अल्लाउद्दीन शेख यांनी ग्रामसभेची माहिती युवकांना सांगितली. तर हरिहर वाटवे यांनी विविध योजनांचा आढावा घेतला.
यावेळी कलमठ ग्रामपंचायतीच्या शिक्षण समितीच्या सदस्या सुवर्णा तांबे यांची अर्पिता मुंबरकर यांनी त्यांच्या शालेय समितीच्या कामासंदर्भात मुलाखत घेतली. यावेळी मंडलिक ट्रस्टमार्फत युवकांसाठी ग्रामसभेत उपस्थित राहून त्या कामकाजासंदर्भात निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, असे जाहीर केले. या कार्यशाळेस महाविद्यालयाचे शंभर विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी केले.
युवकांनी सजग असावे
मुक्ता दाभोलकर पुढे म्हणाल्या की, युवकांनी पंचायत राज व्यवस्थेत सजग भूमिका बजावायला हवी. नागरिकांनाही योजनांची माहिती करून द्यायला हवी. या कार्यक्रमात चिंतामणी सामंत आणि सिद्धी वरवडेकर यांनी ग्रामसभा आणि ग्रामपंचायत कारभार या संदर्भात आपले अनुभव सांगितले.