सिंधुदुर्ग : पोलिसांचा खबऱ्या असल्याची बतावणी करणाऱ्या युवकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 02:06 PM2018-10-11T14:06:01+5:302018-10-11T14:13:00+5:30
पोलिसांचा खबऱ्या आहे अशी बतावणी करुन पानाची टपरी चालविणाऱ्याकडून पैसे उकळणाऱ्या युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्या युवकाचे नाव इजाज दिलावर शेख (28, रा.कोल्हापुर , राजारामपुरी ) असून ही घटना मंगळवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली होती.
कणकवली : पोलिसांचा खबऱ्या आहे अशी बतावणी करुन पानाची टपरी चालविणाऱ्याकडून पैसे उकळणाऱ्या युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्या युवकाचे नाव इजाज दिलावर शेख (28, रा.कोल्हापुर , राजारामपुरी ) असून ही घटना मंगळवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली होती.
कणकवली गांगोमंदिर शेजारी दीपक शंकर बागवे( रा. कणकवली , टेंबवाड़ी ) याची पानाची टपरी आहे. मंगळवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास एक युवक त्या पानाच्या टपरिवर आला. त्याने तिथे सिगारेट घेतली. त्यानंतर पानाच्या टपरीचा मोबाईल मध्ये फोटो काढला.
टपरी चालक दीपक बागवे याला तू मटका जुगारावर पैसे घेतोस अशी माहिती मला मिळाली आहे. मी पोलिसांचा खबऱ्या आहे असे सांगितले. त्याचप्रमाणे आमचे साहेब जानवली पुलाच्या पलीकडे थांबले आहेत . त्याना भेटूया असे सांगितले. त्याच्याजवळ नंबर नसलेली अक्टिव्हा गाडी होती.त्यावर बसवून त्याने दीपक बागवे याला जानवली पुला पलीकडे नेले.
तिथे गेल्यावर बागवे यांने त्याला साहेब कुठे आहेत ?असे विचारले . तर साहेब पुढे गेले आहेत.ते येतील असे सांगितले. तू मटका घेतोस . तुझ्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल .असे सांगत यातून बाहेर पडायचे असेल तर 10 हजार 500 रूपये दे अशी मागणी केली.
बागवे याने आपल्याकडे तेवढे पैसे नसल्याचे सांगितले. त्यामुळे 5 हजार 500 रूपये देण्याचे ठरले. घाबरलेल्या बागवे याने आपल्या मेहुण्याला फोन करून पैसे आणण्यास सांगितले. तसेच इजाज शेख याला पैसे दिले. शेख तिथून निघून गेला.
त्यानंतर बागवे याने आपल्या काही मित्रांना या घटनेबाबत सांगितले. त्यांनी अशी कोणी व्यक्ति नसल्याचे त्याला सांगितले.तसेच त्या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र तो सापडला नाही. बुधवारी सकाळी बागवे याने कणकवली पोलिस ठाण्यात या घटनेबाबत तक्रार नोंदविली. त्यानंतर पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी, सहाय्यक पोलिस निरीक्षक ए.एस.ओतवणेकर यांनी तपास सूत्रे हलविली.
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बापू खरात, वाहतूक पोलिस प्रकाश गवस, दिलीप पाटील यानी जोरदार शोध मोहिम राबवून दीपक बागवे याने सांगीतलेल्या वर्णनाच्या व्यक्तीला कणकवलीतच ताब्यात घेतले. त्याची चौकशी केल्यावर पोलिसांचा खबऱ्या असल्याची सांगणारी तीच व्यक्ति असल्याचे स्पष्ट झाल्याने इजाज शेख याला अटक करण्यात आली. या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत. या घटनेमुळे कणकवली शहरासह परिसरात खळबळ उडाली आहे.