नाट्य चळवळीला चालनेसाठी तरुणांचा पुढाकार
By admin | Published: March 16, 2016 10:42 PM2016-03-16T22:42:41+5:302016-03-16T23:50:57+5:30
‘स्वराध्या फाऊंडेशन’ची स्थापना : एप्रिल महिन्यात राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा
मालवण : मालवण ही कलाकारांची खाण म्हणून ओळखली जाते. नाट्य क्षेत्रासह गीतगायन, भजन आदी कला प्रकारात अग्रेसर असलेल्या मालवण नगरीत नाट्यक्षेत्राची चळवळ मंदावली. मालवणच्या नाट्य चळवळीला पुन्हा एकदा उभारी मिळावी या दृष्टीकोनातून मालवण येथील समविचारी तरुणांनी स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी ‘स्वराध्या फाऊंडेशन’ संस्थेची स्थापना केली आहे. मालवणातील मंदावलेल्या नाट्य चळवळीला उभारी देण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला आहे.
‘स्वराध्या फाऊंडेशन’च्यावतीने मालवणात नाट्यक्षेत्राशी संबंधित विविध उपक्रम, कार्यशाळा तसेच स्पर्धा घेण्यात येणार आहे. संस्थेचे पहिलेच वर्ष असल्याने आधुनिक नाट्यसृष्टीचे जनक कै. मामासाहेब वरेरकर यांच्या नावाने ‘मामा वरेरकर करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १६ व १७ एप्रिल रोजी मामा वरेरकर नाट्यगृह येथे होणार असून उद्घाटक म्हणून वस्त्रहरणकार तथा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत, अशी माहिती अध्यक्ष सुशांत पवार यांनी दिली. शहरातील भरड येथील हॉटेल लीलांजली येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी अध्यक्ष सुशांत पवार, उपाध्यक्ष गौरव ओरसकर, खजिनदार गौरव काजरेकर, रुपेश नेवगी, सहसचिव विनायक भिलवडकर, महेश काळसेकर आदी उपस्थित होते. यावेळी रुपेश नेवगी यांनी मामा वरेरकर यांच्या नावाने स्पर्धेचे आयोजन करण्यामागचे उद्दिष्ट स्पष्ट केले तर पवार यांनी मालवणात नाट्यसंस्कृतीला चालना मिळावी या दृष्टीने संस्थेचे स्थापना करण्यात आली असून ‘चळवळ नाटकाची, अस्मिता मालवणची’ या ब्रीदवाक्याने संस्थेची वाटचाल राहील, असे सांगितले. नाट्य संस्कृतीची अस्मिता टिकावी यासाठी तरुणांनी चळवळ उभी केली आहे. आधुनिकतेने छेद देत नाट्य चळवळीत भरीव कार्य करणार, असेही ओरसकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
स्पर्धेची पारितोषिके
‘स्वराध्या फाऊंडेशन’च्यावतीने घेण्यात येणाऱ्या मामा वरेरकर करंडक एकांकिका स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे १५ हजार, १२ हजार, ८ हजार रुपये, चषक व प्रमाणपत्र तसेच उत्तेजनार्थ संघाला ५ हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे. शिवाय पुरुष अभिनय, स्त्री अभिनय, दिग्दर्शन, प्रकाश योजना, पार्श्वसंगीत, नेपथ्य आणि सुजाण प्रेक्षकांना वैयक्तिक बक्षिसे ठेवण्यात आली आहे. प्रथम १२ संघाना स्पर्धेत प्राधान्य दिले जाणार आहे. इच्छुक संघांनी ५ एप्रिलपर्यंत गौरव ओरसकर यांच्याकडे नावनोंदणी करावी, असे आवाहन स्वराध्या फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे.