‘युवा कृषी महोत्सव’१९ पासून
By admin | Published: January 23, 2015 09:09 PM2015-01-23T21:09:11+5:302015-01-23T23:37:27+5:30
सुधीर सावंत यांची माहिती : सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठानच्यावतीने आयोजन
सिंधुदुर्गनगरी : शेतकऱ्यांनी सामूहिक शेतीकडे वळावे, शेतकऱ्यांचा सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक विकास व्हावा, हे उद्दिष्ट्य समोर ठेवून १९ ते २२ फेब्रुवारी या कालावधीत सिंधुदुर्गनगरी येथे ‘युवा कृषी महोत्सव २०१५’ चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान, किर्लोसचे अध्यक्ष ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ब्रिगेडीअर सावंत बोलत होते. यावेळी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य महेश परुळेकर, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. मंदार गीते, विलास सावंत, आदी उपस्थित होते.यावेळी माहिती देताना ब्रिगेडीअर सावंत म्हणाले की, छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या १४ व्या वर्धापनदिनानिमित्त १९ ते २२ फेब्रुवारी दरम्यान शिवजयंतीचे औचित्य साधून कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये आधुनिक कृषी तंत्रज्ञान मार्गदर्शन, प्रक्षेत्र भेटी, शिवार फेरी, यशोगाथा, कृषी प्रदर्शन, चर्चासत्रे, प्रशिक्षणे, प्रात्यक्षिके, महिला सक्षमीकरण तसेच जिल्हास्तरीय सांस्कृतिक, कला व क्रीडाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यावेळी शिवमुद्रा ही स्मरणिका प्रसारित करण्यात येणार आहे. कृषी विज्ञान केंद्रातर्फे यावर्षी दोन हजार शेतकरी, महिला, युवक, युवती व विस्तार कार्यकर्ते यांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून ज्ञानार्जन केले आहे.कृषी महोत्सव कार्यक्रमाची रूपरेषा१९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती दिवशी कृषी कॉलेजचे विद्यार्थी पहाटे ४.३० वाजता शिवज्योत घेऊन ओरोस ते मालवण किल्ल्यावर जाणार आहेत. नंतर दुपारी कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय कृषी राज्यमंत्री संजीव बलियान, राज्याचे कृषिमंत्री एकनाथ खडसे, पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांच्या उपस्थितीत होणार आहे. दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत कोकणातील कृषी विकासावर मार्गदर्शन तसेच रांगोळी स्पर्धा, ५ ते ७ या वेळेत आकाश दर्शन आणि सायंकाळी ७ ते १० या वेळेत गोविंदराव पानसरे यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावरील व्याख्यान.
२० फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० ते ११ या वेळेत छत्रपती एकता दौड, सकाळी ११ ते दुपारी १.३० कोकण विकासावर चर्चासत्र, कोकण रेल्वेच्या विषयावर चर्चासत्र, दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळेत जलतरण स्पर्धा, सायंकाळी ७ ते १० वाजेपर्यंत भजनाची डबलबारी, आदी कार्यक्रम होतील.२१ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दुपारी १२ पाककला स्पर्धा तसेच ग्रामीण विकासावर चर्चा, कृषी उद्योग विकासावर चर्चा, कृषी बँकिंगवर चर्चा, दुपारी २ ते ३ या वेळेत फुगडी स्पर्धा, दुपारी ३ ते ५ या वेळेत हरवलेले पालकत्व व भरकटलेले विद्यार्थी यावर मार्गदर्शन, सायंकाळी ५ ते रात्री १० महाविद्यालयाचे सांस्कृतिक कार्यक्रम.२२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा, शेतकरी मेळावा, दुपारी २ ते ३ या वेळेत स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा व दुपारी ३ वाजता कृषी महोत्सवाचा समारोप होणार आहे, अशी माहिती ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांनी दिली.(प्रतिनिधी)
युवा कृषी महोत्सवाची प्रमुख उद्दिष्ट्ये
गेल्या दहा वर्र्षात सिंधुदुर्ग जिल्हा विकासापासून २५ वर्षे मागे गेला. त्याचे कारण या जिल्ह्यात विकासाभिमुख एकही काम झाले नाही. जिल्ह्यात केवळ राजकारण झाले.
जर विकास साधायचा असेल, तर नेमके काय पाहिजे हा सारासार विचार करून ‘कृषी महोत्सव’ हा मुख्य विषय हाती घेतला आहे. या महोत्सवामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी विकू नयेत.
जिल्हा कृषी प्रतिष्ठान शेतकऱ्यांच्या जमिनी विकसित करील, शेतकऱ्यांनी सामूहिक शेतीकडे वळावे यासाठी मार्गदर्शन करील, शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
शेतकऱ्यांचा सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
शेतकरी आणि शेती संबंधित संस्थांचा समन्वयक निर्माण करणे, प्रक्षेत्रावरील प्रत्यक्ष पीक प्रात्यक्षिकांचे प्रयोग दाखवून शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढविणे, शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर घालणे हे प्रमुख उद्दिष्ट्य समोर ठेवून कृषी महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.