युवराज वारंग मृत्यू प्रकरण : चौघांवर मनुष्यवधाचा गुन्हा, ९ पर्यंत पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 14:35 IST2020-12-07T14:33:08+5:302020-12-07T14:35:40+5:30
Crimenews, Police, Kudal, Sindhudurngnews हळदीचे नेरूर-तिवरवाडी येथील युवराज वारंग (१८) याच्या छातीत बंदुकीचा छर्रा घुसून झालेल्या मृत्यूप्रकरणी कुडाळ पोलिसांनी चार संशयितांना शनिवारी ताब्यात घेत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

युवराज वारंग मृत्यू प्रकरण : चौघांवर मनुष्यवधाचा गुन्हा, ९ पर्यंत पोलीस कोठडी
कुडाळ : हळदीचे नेरूर-तिवरवाडी येथील युवराज वारंग (१८) याच्या छातीत बंदुकीचा छर्रा घुसून झालेल्या मृत्यूप्रकरणी कुडाळ पोलिसांनी चार संशयितांना शनिवारी ताब्यात घेत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी चारही संशयितांना ९ डिसेंबरपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच घटनास्थळी जंगलातून दोन बंदुकाही ताब्यात घेण्यात आल्या असल्याची माहिती कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली.
२६ नोव्हेंबर रोजी युवराजच्या छातीत काडतूस बंदुकीचा छर्रा घुसून त्याचा मृत्यू झाला होता. ही घटना त्याच्या घरापासून २५० ते ३०० मीटर अंतरावर असलेल्या जंगलमय भागात घडली होती. युवराजच्या छातीत घुसलेला छर्रा हा अन्य कुणाकडील बंदुकीने घुसला असल्याच्या तसेच शिकारीसाठी १० ते १२ जण असण्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढून तसा तपास सुरू केला होता.
दरम्यान, शनिवारी रात्री या प्रकरणी केतन आगलावे (२७, रा. चाफेली-दळवीवाडी), शिवाजी घाडी (३१, रा. हळदीचे नेरूर), सुनील राऊळ (२६, रा. वाडोस) व अमरेश कविटकर (३२, रा. हळदीचे नेरूर) या चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या चारही जणांना ९ डिसेंबरपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अजून काही जण शिकारीस गेल्याचा संशय
यातील संशयित केतन आगलावे याला दोन ठिकाणी बंदुकीचे छर्रे अंगात घुसून तो जखमी झाला आहे. त्याने जिल्ह्याबाहेर जाऊन उपचार करून घेतले अशी माहिती मिळत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास घटनास्थळी जाऊन करीत असताना दोन काडतुसाच्या बंदुका सापडल्या असून त्या जप्त करण्यात आल्या आहेत.
या प्रकरणी १० ते १२ जण जंगली प्राण्याची शिकार करण्याच्या उद्देशाने गेले होते अशीही माहिती मिळत असून अजून किती जण आहेत याचा तपास करीत आहोत, अशी माहिती कोरे यांनी दिली.