आशिये येथे सरोद वादनाने घेतला रसिक मनाचा ठाव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 01:52 PM2019-07-29T13:52:12+5:302019-07-29T13:53:22+5:30
येथील गंधर्व फाऊंडेशनच्यावतीने आशिये येथील श्री दत्त क्षेत्र येथे ३१ व्या गंधर्व शास्त्रीय संगीत मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या संगीत सभेत पं.प्रदीप बारोट यांचे मुंबई येथील शिष्य आदित्य आपटे यांनी सुमधुर असे सरोद वादन केले. या सरोद वादनाने रसिकांच्या मनाचा अगदी ठाव घेतला. यानिमित्ताने संगीत रसिकांना एक अविस्मरणीय क्षण अनुभवता आला.
सुधीर राणे
कणकवली : येथील गंधर्व फाऊंडेशनच्यावतीने आशिये येथील श्री दत्त क्षेत्र येथे ३१ व्या गंधर्व शास्त्रीय संगीत मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या संगीत सभेत पं.प्रदीप बारोट यांचे मुंबई येथील शिष्य आदित्य आपटे यांनी सुमधुर असे सरोद वादन केले. या सरोद वादनाने रसिकांच्या मनाचा अगदी ठाव घेतला. यानिमित्ताने संगीत रसिकांना एक अविस्मरणीय क्षण अनुभवता आला.
शास्त्रीय संगीताच्या प्रचार व प्रसारार्थ यशस्वीपणे व डोळसपणे चालू असलेली सिंधुदुर्गातील एकमेव गंधर्व शास्त्रीय संगीत सभा ही आता कलाकार आणि रसिकांच्या पसंतीस उतरु लागली आहे. यामध्ये दर महिन्याला एक कलाकार आपली कला सादर करतो. ३१ वी गंधर्व मासिक संगीत सभा ही आदित्य आपटे यांनी सजवली.त्यांना तबला साथ सिद्धेश कुंटे यांनी केली.
आदित्य आपटे यांनी प्रथम सरोद या वाद्याची माहिती व ओळख रसिकांना करून दिली. त्यानंतर त्यांनी राग पुरिया कल्याण व तदनंतर राग मियामल्हार सादर केला. अत्यंत तरल आणि सौन्दर्यविचारपुर्वक ,शास्त्रपूर्ण आणि भावपूर्ण वादनामुळे रसिक या वादनात गुंग झाले. या कलाकारांचे स्वागत जिल्ह्यातील नामवंत नाटककार डॉ. राजेंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात श्याम सावंत यांनी आदित्य आपटे यांच्या कलाविचारांचा वेध घेणारी मुलाखत घेतली.यामध्ये त्यांनी सर्व प्रश्नांना अत्यंत समर्पक उत्तरे दिली.
कलेप्रती प्रामाणिक आणि मेहनतीला व अभ्यासाला प्राधान्य देणारा द्रष्टा माणूस कलाकार म्हणून कसा श्रेष्ठ असतो . याचाच उपस्थित रसिकांना यानिमित्ताने अनुभव आला. अनेक पुरस्कार,अनेक पारितोषिके मिळवणारा हा सरोद वादक कलाकार गेले काही वर्षे पं.उल्हास कशाळकरांकडे गायनाचे ही धडे गिरवतो आहे, याचा उल्लेख झाल्यानंतर त्यांना गाण्यासाठी आग्रह झाला. रसिकांच्या आग्रहास्तव त्यांनी केदार रागातील छोटा ख्याल गायला व "टप्पा"गायनानंतर त्यांनी मैफिलीची सांगता केली.
अविनाश पटवर्धन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कणकवलीतील संध्या पटवर्धन व त्यांच्या कुटुंबियांच्या विशेष सहकार्याने ही मैफिल आयोजित करण्यात आली होती. या मासिक सभेसाठी मयूर कुलकर्णी,सागर महाडिक,किशोर सोगम ,संतोष सुतार, संदीप पेंडुरकर ,दामोदर खानोलकर,विलास खानोलकर ,राजू करंबेळकर ,विजय घाटे,अभय खडपकर,शाम सावंत, धीरेश काणेकर,मनोज मेस्त्री यांनी विशेष मेहनत घेतली.
३२ वी गंधर्व संगीत सभा २५ ऑगस्ट रोजी!
३२ व्या गंधर्व संगीत सभेचे आयोजन २५ ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. आसामच्या श्रुती बुजरबरुहा यांच्या गायनाने ही गंधर्व संगीत सभा सजणार आहे. यावेळी रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन गंधर्व फाउंडेशनच्यावतीने यावेळी करण्यात आले.