तीन विभागांचा शून्य टक्के निकाल
By admin | Published: October 27, 2015 11:33 PM2015-10-27T23:33:56+5:302015-10-27T23:59:37+5:30
रत्नागिरी : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रकारामुळे संताप
रत्नागिरी : येथील औद्योगक प्रशिक्षण केंद्रात २३ विविध अभ्यासक्रम शिकवण्यात येतात. पैकी १३ विभागांचा निकाल लागला असून, एकूण निकाल ६०.५८ टक्के इतका लागला आहे. पैकी तीन विभागांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. त्यामुळे विद्यार्थीवर्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील काही विभागांचे अभ्यासक्रम दोन वर्षाचे तर काही एक वर्षाचे आहेत. शैक्षणिक सत्र सेमिस्टर पध्दतीने विभागले आहे. दोन वर्षासाठी चार तर एका वर्षासाठी दोन सेमिस्टरमध्ये परीक्षा घेण्यात येते. चारही सेमिस्टर उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. मात्र, काही विद्यार्थ्यांचे तीन सेमिस्टर सुटले आहेत तर चौथे सेमिस्टर अनुत्तीर्ण झाले आहेत. तर काही विद्यार्थी एक, दोन व चार सेमिस्टरमध्ये उत्तीर्ण असून, चक्क तिसऱ्या सेमिस्टरमध्ये अनुतीर्ण झाले आहेत. प्रक्षिणार्थींना नाकारलेपहिले तीन सेमिस्टर उत्तीर्ण असून, चौथी सेमिस्टर परीक्षा दिल्यानंतर काही कंपन्यांकडून प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात आली होती. मात्र, चौथ्या सेमिस्टरचा निकाल लागल्यानंतर काही विद्यार्थी नापास झाल्यामुळे त्यांना कंपन्यांनी नाकारले आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्पर्धात्मक परीक्षापध्दतीस्पर्धात्मक परीक्षा पध्दतीचा अवलंब गतवर्षीपासून सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यायी उत्तराला गुणांकन करताना राहिले, चुकून झाले नाही तर गुण कमी होत आहेत. शिवाय निगेटीव्ह गुणांकन पध्दतीमुळेही विद्यार्थ्यांचे गुण कमी होत आहेत. विद्यार्थ्याना प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास असणे आवश्यक आहे. तरच पर्यायी उत्तरे शोधणे सोपे होते. स्पर्धात्मक पध्दती अद्याप विद्यार्थ्यांना अवगत झालेली नसल्यामुळे अनुत्तीर्णतेचे प्रमाण वाढले आहे.
यावर्षी पहिल्यांदाच इतका कमी निकाल लागला आहे. नूतन परीक्षा पध्दतीची शिकार यावर्षीची बॅच ठरली आहे. कोणतीही परीक्षा पध्दत अवलंबण्यापूर्वी ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचते का? याचा विचार प्रशासनाने करणे गरजेचे आहे. अनेक विद्यार्थी नापास झाल्याने त्यांना घरी बसण्याची वेळ आली आहे. आयटीआय अभ्यासक्रम जोपर्यंत पास होत नाहीत तोपर्यंत दहावी पास इतकाच शिक्का असल्याने नोकरी मिळणे कठीण झाले आहे. अध्यापक वर्गाकडूनही संबंधित परीक्षा पध्दतीबाबत सखोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना न झाल्यानेच त्यांच्यावर नापास म्हणून शिक्का बसला आहे. (प्रतिनिधी)
तीस टक्के पदे रिक्त
औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील अनेक विषयांसाठी मार्गदर्शक शिक्षकच उपलब्ध नाहीत. ४५ शिक्षकांची आवश्यकता असताना केवळ २९ पदे भरलेली असून, १६ पदे रिक्त आहेत. कार्यालयीन कर्मचारी १५ आवश्यक असताना ६ पदे भरलेली असून ९ पदे रिक्त आहेत. अध्यापन करणारी पदे रिक्त असल्यामुळे ७ पदे घड्याळी तासाप्रमाणे भरण्यात आली असल्याचे प्रशिक्षण केंद्रातर्फे सांगण्यात आले. रिक्त पदांमुळे केंद्राची प्रतिमा ढासळत चालली आहे.
शून्य टक्के निकाल
मशिनिस्ट ग्रार्इंडर, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नोलॉजी सिस्टीम मॅनेजमेंट, मेकॅनिक मशिन टू मेंटेनन्स या तीनही विभागांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. त्याचबरोबर इन्स्टूमेंट मेकॅनिक विभागाचा २३.८१ टक्के इतका कमी निकाल लागला आहे. या विभागातील २१ विद्यार्थ्यांपैकी सलग १ ते १६ क्रमांकाचे विद्यार्थी अनुतीर्ण तर १७ ते २१ क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
फी वाढीचा दणका
डिसेंबरपर्यंत एका सेमिस्टरसाठी ७५ रूपये परीक्षा शूल्क आकारण्यात येत होते. मात्र, जानेवारीपासून त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. फ्रेश विद्यार्थ्यांसाठी ५५० तर पुनर्परीक्षार्थींसाठी ६५० रूपये शुल्क करण्यात आले आहे. दहावीला ७० ते ८० टक्के गुण असतानाही व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्राधान्य देण्यात येते. या अभ्यासक्रमासाठी सवलतीचा पासही नसल्याने गोरगरीब पालक पोटाला चिमटा घेत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पाठवतात. यावर्षीच्या निकालाने घोर निराशा झाली आहे.
फेरतपासणी
अर्जाच्या तारखाच नाहीत
शून्य टक्के तसेच सलग नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी एकच सामूहिक अर्ज सर्वांच्या स्वाक्षरीने औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात सादर करावा. जेणेकरून बोर्डाकडे हा अर्ज सादर केला जावू शकतो. उत्तरपत्रिकेची फोटो कॉपी पाहण्यासाठी १०० रूपये शूल्क आकारण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी वेळेत फेरतपासणी करून जानेवारीत होणाऱ्या सेमिस्टरसाठी पुनर्परीक्षार्थी म्हणून अर्ज सादर करावा. मात्र, बोर्डाकडून पुनर्परीक्षार्थींना परीक्षेचे अर्ज भरण्याच्या तारखा अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत.