जिल्हा परिषद म्हणजे भ्रष्टाचाराचा अड्डा
By admin | Published: June 10, 2016 12:02 AM2016-06-10T00:02:28+5:302016-06-10T00:13:38+5:30
राजन तेली : पंकजा मुंडे यांच्याकडे करणार तक्रार, पदाधिकाऱ्यांमार्फत अनेक निकृष्ट काम
सावंतवाडी : जिल्हा परिषदेवर कुणाचाही अंकुश नसल्याने पदाधिकाऱ्यांमार्फत अनेक निकृष्ट कामे होत आहेत. याबाबत जिल्हापरिषदेविरूद्ध अनेक तक्रारी वाढल्या असल्याने जिल्हा परिषद भष्ट्राचाराचा अड्डा बनत आहे, अशी टिका भाजपचे सरचिटणीस राजन तेली यांनी पत्रकार परिषदेतून केली.
येथील पर्णकुटी विश्राम गृहावर आयोजित पत्रकार परिषदेत तेली बोलत होते. याप्रसंगी तालुकाध्यक्ष मनोज नाईक, यशवंत आठलेकर, शहराध्यक्ष आनंद नेवगी, महिला तालुकाध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, परिणीता वर्तक, निशांत तोरसकर, राजू गावडे, विराग मडकईकर आदी उपस्थित होते.
यावेळी तेली म्हणाले, जिल्हा परिषदेचे रस्ते निकृष्ट दर्जाचे झाले असून विहिरी अस्तित्वात नसतानाही बिले काढली जात आहेत. तर कृषी विभागातील खरेदीही टेंडरशिवाय केली, नवीन अंगणवाडीत उभारल्या पण आवश्यक असणाऱ्या विद्युत पुरवठा सारख्या सोयी मात्र दिल्या नाहीत. अशा अनेक कामात जिल्हा परिषद अपयशी ठरत आहे. जिल्ह्यातील अनेक कामांसाठी शासन निधी देऊनही विकासाला खिळ बसली आहे. याबाबत संबंधित खात्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे तेली यांनी सांगितले. तसेच वेळ पडली तर जिल्हा परिषदेविरूद्ध जन आंदोलन करणार असल्याचा इशारा तेली यांनी दिला.
पालकमंत्र्यांवर आपला कोणताही रोष नसून त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी आलेल्या निधीच्या नियोजनासाठी बैठका घ्याव्यात. तसेच अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवावा. अधिकारी ऐकत नसेल तर कारवाई करावी. तरच विकासकामे होऊ शकतात, अन्यथा काहीही होऊ शकत नाही. तसेच विधान परिषदेवर निवडून आलेले आमदार नारायण राणे व रविंद्र फाटक यांचे अभिनंदन राजन तेली यांनी यावेळी केले.
काँग्रेस जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी राजन तेली विषारी सर्प असल्याचा उल्लेख केला होता. यावर दत्ता सामंत हे राजकारणात माझा कार्यआपण चिल्लर कार्यकर्त्यांना उत्तरे देत नाही, अशी प्रतिक्रिया राजन तेली यांनी पत्रकार परिषदेतून
दिली. (वार्ताहर)
स्वत:च योजना लाटणारे सदस्य
काही जिल्हा परिषद सदस्यांनी शासनाच्या काही योजनांचा स्वत:हून लाभ घेतला आहे. शासनाच्या कोणत्याही योजनेचा सदस्याला अशाप्रकारे लाभ घेता येऊ शकत नाही. त्याचे सदस्यपद रद्द होऊ शकते. आतापर्यंत दोन सदस्यांनी लाभ घेतलेल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचेही राजन तेली यांनी यावेळी स्पष्ट केले.