१०२ वर्षांच्या आज्जींचा तितकाच मोठा कारनामा, ठरल्या सर्वात वृद्ध स्कायडायवर!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 11:54 AM2018-12-14T11:54:43+5:302018-12-14T11:55:23+5:30
स्कायडायव्हींगचा थरार केवळ तोच व्यक्ती जाणू शकतो, ज्याने ते केलं असेल. अनेकांना असा काहीतरी भन्नाट अनुभव घ्यायचा असतो. पण सगळ्यांनाच ते जमतं असं नाही.
स्कायडायव्हींगचा थरार केवळ तोच व्यक्ती जाणू शकतो, ज्याने ते केलं असेल. अनेकांना असा काहीतरी भन्नाट अनुभव घ्यायचा असतो. पण सगळ्यांनाच ते जमतं असं नाही. कारण स्कायडायव्हींग करण्यासाठी तुमच्यात फार हिंमत हवी असते. खरंतर सामान्यपणे स्कायडायव्हींग करण्यासाठी लागणारी हिंमत किंवा जोश हा तरुणांमध्येच बघायला मिळतो. पण अनेकदा काही वृद्धही असं काही करुन जातात की, तरुणांनाही मागे राहतात.
ऑस्ट्रेलियातील चक्क १०२ वर्षांत्या एका महिलेने असाच एक भन्नाट कारनामा केला आहे. त्यामुळे यातून पुन्हा एकदा हे स्पष्ट झालं आहे की, इच्छाशक्ती असेल तर व्यक्ती काहीही करु शकतो. यात ना वय आडवं येत ना भीती. या १०२ वर्षांच्या आज्जीचं नाव आहे इरेना ओशिया. ज्यांनी हा साहसी कारनामा करुन सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला आहे. सद्या आज्जीबाई या कारनाम्यामुळे सोशल मीडियात चांगल्याच चर्चेक आहेत.
इरेना या आता अधिकृतपणे जगातल्या पहिल्या सर्वात वृद्ध स्कायडायवर झाल्या आहेत. त्यांनी आपल्या परिवाराच्या आणि मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत स्कायडायव्हींग केलं आणि साऊथ ऑस्ट्रेलियाच्या मोटर डिजीज असोसिएशनसाठी धनराशीही जमवली. रिपोर्ट्सनुसार, इरेनाने हे स्कायडायव्हींग तिच्या मुलीला डेडिकेट केलं. कारण त्यांच्या मुलीचा १० वर्षांआधी मोटर न्यूरॉन डिजीजने मृत्यू झाला होता.
इथे लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे १०२ वर्षांच्या इरेना यांचं हे पहिलंच स्कायडायव्हींग नव्हतं. याआधी २०१७ मध्येही त्या सर्वात वृद्ध स्कायडायवर ठरल्या होत्या. त्यांनी गेल्या रविवारी पुन्हा एकदा आपलाच रेकॉर्ड तोडला.