बापरे! ६ फूट लांब कोब्रा, रीलसाठी तोंडात दाबला; पुढं जे घडलं ते धक्कादायक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2024 11:52 AM2024-09-08T11:52:35+5:302024-09-08T11:54:04+5:30
सोशल मीडियावर एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, या व्हिडीओत हा तरुण सहा फूट लांब कोब्रा तोंडाने उचलत असल्याचं दिसत आहे.
सध्या सोशल मीडियावर रील बनवणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, रील बनवण्यासाठी तरुण काहीही करत असल्याचे दिसत आहे. तेलंगणामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी एक तरुण कोब्रा तोंडात घेऊन रील बनवत असल्याचं दिसतंय. आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
तरुणाने तोंडात कोब्रा पकडला आहे. या स्टंटदरम्यान तो कोब्रा चावला, त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले.
तेलंगणातील कामारेड्डी जिल्ह्यातील देसीपेट गावात ही हृदयद्रावक घटना घडली. २० वर्षीय तरुणाचे नाव शिवा असे आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी तरुणाने कोब्रासोबत धोकादायक स्टंट केला. पण हा स्टंट त्याला महागात पडला. या स्टंटमुळे त्याला त्याचा जीव गमवावा लागला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये तरुण रस्त्यावर उभा असल्याचे दिसत आहे. त्याच्या मागे दुसरा मुलगा मोबाईलवर व्हिडीओ बनवत आहे. शिवाने तोंडात सुमारे सहा फूट लांब कोब्रा पकडला आहे. समोरून एक व्यक्ती व्हिडीओ शूट करत आहे. ती व्यक्ती तेलुगुमध्ये काहीतरी बोलत आहे. यावेळी कोब्राची धडपड दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवाचे वडील सर्पप्रेमी आहेत. यातूनच तो आपला उदरनिर्वाह करतात. शिवाने एका कॉलनीत या कोब्राला पकडले होते. यानंतर त्याने त्याच्यासोबत रील बनवण्यास सुरुवात केली. त्याला कोब्रा चावल्याचे जाणवले नव्हते. दुपारी तरुणाची प्रकृती खालावली, तो आधी बेशुद्ध पडला. यानंतर कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. पण, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.