थरारक! कपडे वाळत घालताना पाय घसरला; १८व्या मजल्यावर लटकत होती महिला अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 01:59 PM2021-11-24T13:59:49+5:302021-11-24T14:00:01+5:30
१८ आणि १७ व्या मजल्यांच्या दरम्यान उलटी लटकत होती महिला
बीजिंग: चीनच्या जिआंगसु प्रांतात एक थरारक घटना घडली आहे. एक वृद्ध महिला १९ व्या मजल्यावर असलेल्या बाल्कनीतून घसरली. कपडे वाळत घालत असताना महिलेचा पाय घसरला आणि ती खाली पडू लागली. मात्र त्यानंतर एक चमत्कार घडला आणि महिलेचा जीव वाचला.
दक्षिण चीनमधील जिआंगसु प्रांतात यंग्जहो भाग येतो. या ठिकाणी असलेल्या एका गगनचुंबी इमारतीत थरारक प्रकार घडला. १९ व्या मजल्यावर वास्तव्यास असलेली ८२ वर्षीय महिला बाल्कनीत कपडे वाळत घालत होती. तेव्हा तिचा पाय घसरला आणि ती खाली पडू लागली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
१९ व्या मजल्यावर असलेल्या बाल्कनीतील महिला खाली पडल्याचं व्हिडीओत दिसत आहे. ही महिला १८ व्या मजल्यावर असलेल्या बाल्कनीतीत कपड्याच्या रॅकमध्ये अडकली. त्या रॅकच्या आधारे ती हवेत लटकत होती. महिलेचं डोकं, हात आणि धड १७ व्या मजल्यावर होतं. तर तिचे पाय १८ व्या मजल्यावरील रॅकमध्ये अडकले होते.
घटना पाहून अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली. स्थानिकांनी तातडीनं पोलीस आणि रेस्क्यू टीमला बोलावलं. रेस्क्यू टीमचे काही सदस्य १८ व्या मजल्यावर पोहोचले. इतरांनी १७ व्या मजल्यावर धाव घेतली. त्यांनी महिलेचं शरीर चारही बाजूंनी बांधलं आणि हळूहळू तिला बाल्कनीकडे खेचलं. सुदैवानं महिलेला कोणतीही गंभीर इजा झाली नाही. बराच वेळ हवेत उलट लटकत असल्यानं महिलेला प्रथमोपचार देण्यात आले.