झपाटलेल्या गावच्या ८२ वर्षीय आजोबांची प्रेमकहाणी पूर्ण होणार; ५० वर्षांनंतर प्रेयसी भारतात येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 05:30 AM2021-04-04T05:30:12+5:302021-04-04T07:00:35+5:30
राजस्थानातील झपाटलेल्या गावात प्रेमकथेचा पुनर्जन्म
जैसलमेर : राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यात एका गावाची ‘झपाटलेले गाव’ अशी ओळख आहे. पण, या झपाटलेल्या गावातच एका अनाेख्या प्रेमकथेने पुनर्जन्म घेतला आहे. या प्रेमकथेचा नायक आहे ८२ वर्षांचा एक चाैकीदार आणि नायिका आहे ऑस्ट्रेलियात राहणारी. या दाेघांची तब्बल ५० वर्षांनी भेट हाेणार असून, त्याची उत्सुकता दाेघांनाही लागलेली आहे.
एखाद्या चित्रपटाला शाेभेल अशीची ही कथा जैसलमेरमधील कुलधारा गावात प्रत्यक्षात घडली आहे. ‘ह्युमन्स ऑफ बाॅम्बे’ या फेसबुक पेजवरून या प्रेमकथेला वाचा फाेडण्यात आली आहे. गावातल्या झपाटलेल्या कथांची कीर्ती दूरवर पसरली आहे. विज्ञानवादी लाेकांनी यामागे वेगवेगळी कारणे दिली. मात्र, गावकऱ्यांचा हे गाव झपाटलेले आहे, यावर ठाम विश्वास हाेता. त्यामुळे अनेक वर्षांपूर्वीच लाेकांनी गाव साेडले. आता वाळवंटातील या ओसाड गावात केवळ ८२ वर्षांचा एक चाैकीदार राहताे. या चाैकीदाराचीच ही कहाणी आहे. सत्तरीच्या दशकात जैसलमेरला त्यांची ऑस्ट्रेलियातून आलेल्या मरीनासाेबत सर्वप्रथम भेट झाली हाेती. ती पाच दिवसांच्या पर्यटनासाठी आली हाेती. त्यावेळी त्यांनी मरीनाला उंटाची स्वारी शिकविली.
दाेघांचेही पहिल्या नजरेतच एकमेकांवर प्रेम जडले. ऑस्ट्रेलियाला परतताना मरीनाने प्रेमाचे तीन शब्द बाेलून भावनांना वाट माेकळी केली. त्यानंतर ती ऑस्ट्रेलियाला परतल्यानंतरही दाेघांमध्ये पत्रव्यवहार सुरू हाेता.
मरीनाने त्यांना ऑस्ट्रेलियाला येण्याचे आमंत्रण दिले. ते त्यावेळी तब्बल ३० हजार रुपये खर्च करून ऑस्ट्रेलियात काही महिने वास्तव्यही करून आले. मात्र, लग्नाच्या मुद्द्यावरून दाेघे वेगळे झाले. दाेघांनाही आपला देश साेडायचा नव्हता. भारतात परतल्यावर या चाैकीदाराने कुटुंबीयांच्या दबावानंतर लग्न केले. त्यांना दाेन मुलेही झाली. त्यांच्या पत्नीचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू झाला. आता ८२ व्या वर्षी प्रेयसी भेटणार म्हणून ते आनंदी आहेत.
ऑस्ट्रेलियातून ‘ती’ लवकरच येत आहे भारतात
विभक्त झाल्यानंतर आता ५० वर्षांनी त्यांना मरीनाने पत्र पाठवले आहे. मरीनाने अद्याप लग्न केलेले नसल्याची माहितीही या पत्रातून त्यांना दिली. ती लवकरच भारतात येत आहे. तब्बल ५० वर्षांनी प्रेयसी भेटणार असल्याचा आनंद त्यांना आहे.
भविष्यात या दाेघांपुढे काय वाढून ठेवलेले आहे, याची त्यांना कल्पना नाही. मात्र, आपले पहिले प्रेम जिवंत असून, स्वस्थ आणि आनंदी असल्याचे त्यांना समाधान जास्त आहे.