7 वर्षीय मुलीच्या व्हिडिओला 90 कोटी व्ह्यू, YouTube वरुन केली 200 कोटींची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 15:34 IST2022-02-09T14:29:24+5:302022-02-09T15:34:57+5:30
अवघ्या 7 वर्षांची सोशल मीडिया स्टार अनास्तासिया रॅडझिंस्काया दर महिन्याला कोट्यवधी रुपयांची कमाई करते.

7 वर्षीय मुलीच्या व्हिडिओला 90 कोटी व्ह्यू, YouTube वरुन केली 200 कोटींची कमाई
रशियन सोशल मीडिया स्टार अनास्तासिया रॅडझिंस्काया(Anastasia Radzinskaya) वयाच्या अवघ्या 7 व्या वर्षी इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. अनास्तासिया इतकी लोकप्रिय झाली आहे की, ती दर महिन्याला एक कोटी रुपयांहून अधिकची कमाई करत आहे. सध्या ती 150 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्तीची मालक आहे.
वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी अनास्तासिया YouTube च्या सर्वात मोठ्या क्रिएटर्सपैकी एक बनली आहे. काही रिपोर्ट्सनुसार, गेल्या वर्षी अनास्थासियाने जवळपास 200 कोटी रुपयांची कमाई केली होती. अनास्तासियाच्या या आश्चर्यकारक यशामागे तिच्या पालकांचा मोठा वाटा आहे. अनास्तासियाने 4 वर्षांपूर्वी अपलोड केलेल्या एका व्हिडिओला 90 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तिच्या चॅनेलला 86 मिलीयन सबस्क्राइबर्स असून, आतापर्यंत एकूण 6900 कोटी व्ह्यू मिळाले आहेत.
कशी होते कमाई?
'डेली स्टार'च्या रिपोर्टनुसार, अनास्तासिया रॅडझिंस्काया तिची लक्झरी लाई आणि फॅमिली ट्रीपवर आधारित व्हिडिओ तयार करते. हा कंटेट ती यूट्यूब आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करते. तिचे इंस्टाग्राम आणि यूट्युबवरील टार्गेट ऑडियन्स(प्रेक्षक) हे लहान मुले आहेत. तिचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असून, तिचा कंटेट अनेकांना आवडतो. यातूनच अनास्तासिया खूप कमाई करते.
सुरुवात कशी झाली ?
2014 मध्ये अनास्तासियाचा जन्म झाला होता. जन्मापासून अनास्तासियाला सेरेब्रल पाल्सी नावाच्या न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरचे निदान झाले. परिणामी, तिचे पालक अॅना आणि सर्गेई यांनी त्यांची नोकरी सोडली आणि मुलीसाठी 'लाइक नास्त्य'(Like Nastya) हे YouTube चॅनेल सुरू केले. गेल्या वर्षी अनास्तासिया YouTube सर्वाधिक-पेड कंटेट क्रिएटर्सच्या टॉप 10 यादीत 6 व्या क्रमांकावर होती.