90 मिनिटे फक्त बसून रहा आणि विजेता बना! 'इथे' आयोजित केली जाते अनोखी स्पर्धा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 05:06 PM2024-11-25T17:06:04+5:302024-11-25T17:12:42+5:30
Space Out : या स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांना ९० मिनिटे काहीच करावं लागत नाही. ना कुणाशी बोलणं, ना हालचाल आणि ना इलेक्ट्रॉनिक डिवाइसचा वापर.
Space Out : आजकाल मोबाइल फोन किंवा वेगवेगळ्या डिजिटल डिवाइसचा वापर लहानांसोबत मोठ्यांमध्येही वाढला आहे. सतत या उपकरणांचा वापर करण्याची सवय अनेक समस्या घेऊन येते. अशात साऊथ कोरियामध्ये मोबाइलची सवय सोडवण्यासाठी एक वेगळी पद्धत अवलंबण्यात येत आहे. इथे दरवर्षी अनोखी स्पर्धा घेतली जाते, ज्याला 'स्पेस आउट' असं नाव देण्यात आलंय.
या स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांना ९० मिनिटे काहीच करावं लागत नाही. ना कुणाशी बोलणं, ना हालचाल आणि ना इलेक्ट्रॉनिक डिवाइसचा वापर. यादरम्यान स्पर्धकांना केवळ शांत बसायचं आहे आणि आपल्या हृदयाच्या ठोक्यांना कंट्रोल करायचं आहे.
स्पेस आउट स्पर्धकांमध्ये हार्ट रेट मॉनिटरिंगच्या आधारावर विजेता निवडला जातो. ज्या स्पर्धकाचा हार्ट रेट सगळ्यात स्थिर राहील त्याला विजेता ठरवलं जातं. या स्पर्धेचा उद्देश लोकांना तणावमुक्त करणं आणि डिजिटल विश्वासपासून थोडा ब्रेक देणं आहे.
आजच्या धावपळीच्या जीवनात लोक थोडा वेळही फोनपासून दूर राहू शकत नाहीत. अशात ही स्पर्धा लोकांना ध्यान आणि शांततेची शक्ती शिकवण्याची एक पद्धत आहे. या अनोख्या स्पर्धेचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तसेच ही स्पर्धा इतर देशांमध्ये आयोजित करण्याची मागणी केली जात आहे.
साऊथ कोरिया टफ वर्क कल्चरसाठी ओळखला जातो. विकसित देशांमध्ये कामाचे तासही अधिक असतात. २०२३ मध्ये सरकारने आठवड्याचे कामाचे तास वाढवून ६९ तास करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. ज्याला भरपूर विरोध झाला आणि शेवटी सरकारला आपला प्रस्ताव मागे घ्यावा लागला होता.