UP मधील 'बेवफा चाय वाला' ज्यांना प्रेमात धोका मिळाला त्यांना चहा स्वस्त; प्रेमी युगुलांसाठी 5 रूपये जास्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 12:03 PM2022-10-27T12:03:16+5:302022-10-27T12:09:03+5:30
उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे तरूणाने चहाचे अनोखे दुकान टाकले आहे.
मुरादाबाद : उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे तरूणाने चहाचे अनोखे दुकान टाकले आहे. हे अनोखे दुकान सध्या खूप चर्चेत असून त्यामागील कारण देखील खास आहे. खरं तर प्रेमात धोका मिळणाऱ्यांसाठी या दुकानात स्वस्त चहा मिळणार आहे. तर बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडसोबत गेल्यास अतिरिक्त दर आकारला जाईल, असे दुकानाच्या फलकावर लिहण्यात आले आहे. जोडप्यांना महागड्या चहासोबत कडू सल्लाही अनुभवायला मिळणार आहे. डिप्रेशनमुळे चहा विकणाऱ्या या चहाच्या स्टॉलच्या मालकाची कहाणी खूप अनोखी आहे.
मुरादाबादच्या सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीतील हरथाळा सोनकपूर येथील मूळ रहिवासी असलेल्या अख्तरने हरताळा येथे आपला स्टॉल सुूरू केला आहे. चहा प्यायल्याबरोबर शरीरात ऊर्जा आणि ताजेपणाची हमी देणारा या स्टॉलचा मालक 40 वर्षीय आहे. हे दुकान सुरू करण्यामागे लॉकडाऊन हे खरे कारण असल्याचे अख्तर सांगतो. याशिवाय तो डिप्रेशनमध्ये होता त्यामुळे लोकांना हसवता यावे यासाठी आपण दुकानाला हे अनोखे नाव दिले आहे असेही त्याने सांगितले.
कसा सुरू झाला चहाचा स्टॉल?
अख्तरने वृत्तवाहिनी न्यूज 18 हिंदीला दिलेल्या माहितीनुसार, तो एक टॅक्सी ड्रायव्हर होता. लॉकडाऊनमध्ये लोकांचे व्यवसाय ठप्प झाले होते. त्यामुळे त्यानेही टॅक्सी चालवणे बंद केले होते. मग काहीतरी वेगळं का करू नये असा विचार त्याच्या मनात आला. मग त्याने घरी चहाचे वेगवेगळे प्रयोग करून पाहिले. अखेर त्याने लवंग, वेलची, केशर, तुळस, घालून एक काढा बनवला, जो अतिशय चवदार होता. मग लॉकडाऊननंतर त्याने हरताळा येथे दुकान उघडले आणि त्या दुकानाचे नाव बेवफा चायवाला असे ठेवले.
कपल्ससाठी वेगळा दर
बेवफा चायचा मालक अख्तरने प्रेमात धोका मिळणाऱ्या लोकांना 10 रूपयांत चहा देण्याचा निर्णय घेतला आहे. तर प्रेमी युगुलांसाठी चहाची किंमत 15 रुपये आहे. कोणी कोणाचे नसते, कोणावर जास्त विश्वास ठेवू नका, अशी भावना असल्यामुळे प्रेमी युगुलांसाठी 5 रुपयांचा महागडा चहा देत असल्याचे अख्तर सांगतो. त्याच्या दुकानात येणाऱ्या जोडप्यांनाही तो याबाबत समजावून सांगतो.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"