अनोखं प्रेम! मालकाला वाचवायला आलेल्या म्हशीचा वीजेच्या धक्क्याने गेला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 11:14 AM2022-07-31T11:14:58+5:302022-07-31T11:16:21+5:30
उत्तर प्रदेशातील भदोरी मधून मानव आणि प्राण्यांच्या प्रेमाचे एक उत्तम उदाहरण समोर आले आहे.
भदोही : उत्तर प्रदेशातील भदोरी मधून मानव आणि प्राण्यांच्या प्रेमाचे एक उत्तम उदाहरण समोर आले आहे. प्राणी मानवावर जीवापाड प्रेम करत असतात याचाच प्रत्यय देणारी घटना भदोरी जिल्ह्यात घडली आहे. इथे एका म्हशीने आपल्या मालकाचा जीव वाचवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. या घटनेचा थरार ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. रक्ताची नाती देखील या प्रेमापुढे कमी पडतील असे सोशल मीडियावरील युजर्स म्हणत आहेत. ही अनोखी घटना अनेकांचे लक्ष वेधत आहे.
भदोरी जिल्ह्यातील बाबूसराय गावात घडलेली घटना चर्चेचा विषय बनली आहे. इथे ५५ वर्षीय पारस पटेल रात्रीच्या वेळी घराच्या बाहेर खाट टाकून झोपले होते. मध्यरात्री अचानक पाऊस सुरू झाल्याने पारस यांनी आपला बिछाणा घेऊन घराकडे कूच केली. याच दरम्यान त्यांचा सामना वीजेच्या धक्क्याशी झाला. घरामध्ये जाताना वीजेची एक तार त्यांच्या बाजूला पडली काटीच्या साहाय्याने ते त्या तारेला हटवत होते तेवढ्यात त्यांचा तारेशी संपर्क झाला. त्यांचा दुर्देवाने जागीच मृत्यू झाला तेवढ्यात त्यांचा मुलगा शिवशंकर घटनास्थळी आला आणि त्यालाही वीजेचा धक्का बसल्याने तो इतरत्र कोलमडू लागला.
म्हशीने वाचवला जीव
आपल्या मालकाच्या मुलाला तडफडताना पाहून दाव्याला बांधलेल्या म्हशीने दावे तोडून त्याच्याकडे धाव घेतली. त्याला धक्का मारून म्हशीने शिवशंकरचा जीव वाचवला मात्र म्हशीने आपला जीव गमावला. शिवशंकर सध्या इस्पितळात दाखल असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे म्हैस आली नसती तर पारस पटेल यांच्यासोबत त्यांच्या पुत्राला देखील आपला जीव गमवावा लागला असता.