लाइट जाताच नवऱ्यांच्या घरच्यांनी केला आरडाओरडा; मुलीकडील लोकांनी मारहाण करत लग्नाला दिला नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 05:26 PM2022-07-11T17:26:29+5:302022-07-11T17:28:36+5:30
उत्तर प्रदेशातील कांठ भागातील जोरवान गावचे रहिवासी रवींद्र पाल यांनी त्यांचा मुलगा रजनीशचा विवाह पिलीभीत जिल्ह्यातील बिलसांडा भागातील बिल्हारा गावातील रहिवासी मोहनलाल यांची मुलगी स्वाती हिच्यासोबत ठरवला होता.
नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथे लग्नादरम्यान जनरेटर बंद असल्याच्या शुल्लक कारणावरून लग्नातील वर पक्ष आणि वधू पक्षामध्ये जोरदार हाणामारी झाली. दोन्हीही बाजूंनी झालेल्या हाणामारीमध्ये लाठ्या-काठ्यांचा मोठ्या प्रमाणात वापर झाला, ज्यामध्ये वऱ्हाडी मंडळीतील अनेक लोक जखमी झाले आहेत. एका तरूणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच नववधूने लग्न करण्यास नकार दिला आहे, ज्यानंतर दोन्हीही बाजूच्या मंडळीनी पोलीस स्थानकात धाव घेतली. पोलीस स्टेशनचे प्रभारी अचल सांगतात की, दोन्ही पक्ष कोणतीही कारवाई न करता आपापल्या घरी गेले. ही घटना पोलीस स्टेशन बिलसांडा परिसरातील आहे.
उत्तर प्रदेशातील कांठ भागातील जोरवान गावचे रहिवासी रवींद्र पाल यांनी त्यांचा मुलगा रजनीशचा विवाह पिलीभीत जिल्ह्यातील बिलसांडा भागातील बिल्हारा गावातील रहिवासी मोहनलाल यांची मुलगी स्वाती हिच्यासोबत ठरवला होता. वऱ्हाड ८ जुलै रोजी रात्री वधु निवासस्थानी पोहोचले. विवाह समारंभातील एका कार्यक्रमादरम्यान अचानक जनरेटर बंद पडल्याचे बोलले जात आहे. याच किरकोळ कारणावरून दोन्ही पक्षांमध्ये वादावादी सुरू झाली आणि वाद वाढला.
वऱ्हाडी मंडळीला केली मारहाण
मुलीकडील लोकांनी लग्नात आलेल्या वऱ्हाडी मंडळीला लाठ्या-काठ्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली, ज्यामध्ये नवरदेव आणि त्याचे काका राम किशोर आणि मित्र दीपक यादव हे मारहाणीमुळे गंभीर जखमी झाल्याचा आरोप आहे. दीपकच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच नवरदेव आणि वऱ्हाडी मंडळींनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि कारवाई करण्याची मागणी केली.
दुसरीकडे नवरीने देखील पोलीस स्थानकात धाव घेतली आणि सासरच्या मंडळीने आपल्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आणि तिने लग्नास नकार दिला. दोन्हीही पक्षातील मंडळीनी पोलीस स्थानकात धाव घेतल्यानंतर पोलीस स्टेशनचे प्रभारी अचल यांनी म्हटले की, दोन्ही पक्ष कोणतीही केस रजिस्टर न करता आपापल्या घरी निघून गेले.