ऐकावं ते नवलच! लोकांच्या प्रेमामुळे घोडा बनला महापौर; आता मिळालं स्वतःचं ऑफिस
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 16:53 IST2022-07-28T16:53:23+5:302022-07-28T16:53:32+5:30
एका गावात महापौरपदी चक्क घोड्याची निवड करण्यात आली आहे.

ऐकावं ते नवलच! लोकांच्या प्रेमामुळे घोडा बनला महापौर; आता मिळालं स्वतःचं ऑफिस
नवी दिल्ली : लोकांनी लोकांच्या हिताकरिता, लोकांकडून चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. लोकशाही कोणत्याही देशाच्या प्रगतीसाठी खूप महत्त्वाची आहे. जिथे लोक स्वत: आपला नेता निवडतात आणि प्रसंगी त्याच नेत्याला खाली देखील बसवतात. मात्र जर एखाद्या गटाचा नेता जर घोडा असेल तर त्यात आश्चर्य होण्यासारखे काही नाही. कारण अमेरिकेतील कॉकिंग्टन (Cockington)येथे चक्क घोड्याला महापौर म्हणून निवडण्यात आले आहे. लोकांनी सर्वांच्या सहमताने घोड्याला महापौरपदी बसवले आहे, कारण या घोड्याने येथील लोकांच्या मनामध्ये स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे लोकांनी त्याला निवडणुकीत उभे केले आणि विजयी देखील केले. आता त्याला स्वतःचे ऑफिसही मिळाले आहे.
या घोड्याचे नाव पॅट्रिक असून तेथील लोक थेरेपी पोनी नावाने देखील त्याला संबोधतात. तसेच पॅट्रिकला बिअर खूप आवडत असून यापूर्वी तो एका पबमध्ये राहत होता. घोड्याने निवडणुकीत आपल्या विरोधात उभे असलेल्या अनेक उमेदवारांचा पराभव करून महापौर पद पटकावले आहे. आता पॅट्रिकला त्याचे वेगळे ऑफिसही मिळाले आहे. मात्र एक घोडा कसा काय महापौर बनू शकतो यावरून अनेक लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
गावकऱ्यांचे मिळाले समर्थन
पॅट्रिकच्या विजयामध्ये गावकऱ्यांचा मोठा वाटा आहे. लोकांकडून मिळालेल्या प्रेमामुळे एका पब बाहेर फिरणारा घोडा आज महापौर बनला आहे. पॅट्रिकला बिअर पिण्याची हौस आहे त्याचा मालक रोज त्याची दारूची हौस भागवतो. गावातील द ड्रम नावाच्या स्थानिक पबमध्ये देखील पॅट्रिकची खूप लोकप्रियता होती. महापौर बनल्यामुळे हा घोडा आता हिरो बनला असून त्याची सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. पॅट्रिकने आपल्या प्रेमळ स्वभावामुळे लोकांच्या मनात जागा मिळवली म्हणून आम्ही त्याला आम्ही महापौर बनवले असे गावातील लोक म्हणत आहेत.