एका व्यक्तीनं अर्ज करत 'इच्छामरण' मागितले; लोकांनी त्याला ५० लाख दिले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 04:31 PM2022-11-30T16:31:53+5:302022-11-30T16:32:33+5:30
आमिरच्या या संकटात आशेचा किरण म्हणून एफी सी नावाची महिला आली
एका व्यक्तीचा काही वर्षांपूर्वी अपघात झाला होता. त्यानंतर त्याला अनेक आजारांनी ग्रस्त केले. रोजचं जगणंही त्याच्यासाठी कठीण बनले. खाण्यापिण्याचेही वांदे झाले. अशा परिस्थितीला कंटाळून अखेर या व्यक्तीने इच्छामरणाची मागणी केली. सोशल मीडियावर या व्यक्तीच्या जीवनाची कहाणी वेगाने व्हायरल होऊ लागली. व्यक्तीची परिस्थिती पाहून नेटिझन्सही भावूक झाले.
कॅनडातील या व्यक्तीच्या मदतीसाठी लाखो लोक सरसावले आहेत. ५४ वर्षीय आमिर फरसौदा हे कॅनडातील सेंट कॅथरिस इथं राहतात. आमिरनं अलीकडेच इच्छा मरणासाठी मेडिकल असिस्टेंस इन डाइंगकडे अर्ज सादर केला आहे. आमिरचा काही वर्षापूर्वी अपघात झाला होता. त्यानंतर त्याला डिस्क डिस्ऑर्डर, स्पाइनल स्टेनोसिस, स्पोंडिलोसिस, पल्मनरी डिजीजसारख्या अनेक आजाराने ग्रस्त केले.
अपघातानंतर आमिरच्या आयुष्यात अनेक डिसेबिलिटी आली. तो खूप काळ वेदनेने तडफडत होता. अनेकदा त्याला बेडवरून उठताही आले नाही. ज्या इमारतीत तो राहायला होता ती विकण्याची वेळ आली. त्यामुळे आता आमिरकडे राहायला घर नाही. आर्थिक आणि शारीरिक या दोन्ही संकटात सापडलेल्या आमिरनं इच्छामरणाचा अर्ज केला.
आमिरच्या या संकटात आशेचा किरण म्हणून एफी सी नावाची महिला आली. एफीने आमिरला या संकटातून बाहेर काढण्यासाठी Gofundme वेबसाइटवर क्राऊडफंडिंग सुरू केले. एफीने वेबसाईटवर लिहिले की, जे कुणी ही पोस्ट वाचत असतील त्यांनी लक्ष द्यावं. मी या व्यक्तीच्या मदतीसाठी इतके पैसे जमवते ज्यामुळे त्याला पुढील ७ वर्ष घराचं भाडे देता येईल आणि खाणेही मिळेल. माणुसकीचा विजय असो असं एफीने पोस्टमध्ये लिहिलंय.
एफीने या कँम्पेनला Choose 2 Live असं नाव दिलंय. या पोस्टवरून आतापर्यंत १२०० लोकांनी मिळून ५० लाख जमा केलेत. या कॅम्पेननंतर आता आमिर फरसौदनं इच्छामरणासाठी केलेला अर्ज मागे घेण्याचा विचार सुरू केलाय. आमिर म्हणाला की, लोकांच्या या मदतीने मी भावूक झालोय. मी डिसेंबरनंतर या जगात नसेन असं वाटत होते. लोकं इतक्या मोठ्या प्रमाणात माणुसकीचं दर्शन घडवतील असं मला वाटलं नव्हतं अशी प्रतिक्रिया आमिरनं एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिलीय.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"