दुधाच्या रिकाम्या पिशव्या द्या आणि पेट्रोल डिझेलवर मिळवा सूट, अनोख्या ऑफरची रंगली चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 02:11 PM2022-08-08T14:11:58+5:302022-08-08T14:13:11+5:30
पेट्रोल-डिझेलच्या दरांनी देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये शंभरी गाठली आहे.
भिलवाडा : पेट्रोल-डिझेलच्या दरांनी (Petrol Diesel Price) देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये शंभरी गाठली आहे. वाढत्या इंधनाच्या किंमतींमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. अशा परिस्थितीत राजस्थानमधील एका पेट्रोलपंपाच्या मालकाने एक भन्नाट ऑफर दिली आहे. दुधाच्या रिकाम्या पिशव्या, प्लास्टिकच्या बॉटल्स द्या आणि पेट्रोल-डिझेलवर सूट मिळवा अशा आशयाचे फलक परिसरात लावण्यात आले आहे. खरं तर पेट्रोल पंपाचे मालक अशोक कुमार मुंद्रा यांचा यामागील उद्देश्य समाजहिताचा आहे. केवळ एकदाच वापरात येणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंची विल्हेवाट लावण्यासाठी ही मोहिम राबवली जात आहे.
दरम्यान, दुधाच्या रिकाम्या पिशव्या आणि प्लास्टिकच्या बॉटल्स देऊन इंधनावर सूट मिळणार आहे. पेट्रोलवर १ रूपया तर डिझेलवर ५० पैसे सूट दिली जाईल असे सांगितले जात आहे. १५ जुलैपासून सुरू झालेल्या या मोहिमेची मोठी चर्चा रंगली आहे. याशिवाय भिलवाडा जिल्ह्यातील प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण बोर्ड या मोहिमेचे समर्थन करत आहे.
दुधाच्या पिशव्या देऊन पेट्रोलवर मिळवा सूट
अशोक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ऑफरअंतर्गत १ लीटर पेट्रोलवर १ रूपया तर १ लीटर डिझेलवर ५० पैसे सूट मिळेल. यासाठी सारस डेअरी उघडण्यात आली आहे, गोळा केलेल्या सर्व पिशव्या आणि बॉटल्स सारस डेअरीला दिल्या जातात. तिथे या प्लास्टिकची विल्हेवाट लावली जाते. आतापर्यंत एकूण ७०० हून अधिक बॉटल्स जमा झाल्या आहेत.
"ही मोहिम ६ महिने राबवण्याचा आम्ही विचार करत आहोत. एका महिन्यात १० हजार प्लास्टिकच्या वस्तू गोळा होतील असा आमचा अंदाज होता मात्र पावसामुळे पंपावर लोकांची ये-जा कमी आहे", अशी माहिती पेट्रोल पंपाचे मालक अशोक कुमार मुंद्रा यांनी दिली.