Unique Research:गर्लफ्रेंड शोधत असाल तर प्रोफाईलवर कुत्र्यांसोबत ठेवा फोटो; रिचर्समधून अजब खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 10:32 AM2022-08-16T10:32:02+5:302022-08-16T10:38:08+5:30
आताचे युग हे सोशल मीडियाचे असून इथे मोठ्या प्रमाणात ऑनलाइन व्यवहार केले जातात.
नवी दिल्ली : आताचे युग हे सोशल मीडियाचे (Social Media) असून इथे मोठ्या प्रमाणात ऑनलाइन व्यवहार केले जातात. गरजू वस्तूंपासून ते जीवनाचा जोडीदार देखील ऑनलाइनरित्या निवडला जाऊ शकतो. मात्र यामध्ये प्रत्येकालाच यश मिळेल असे नाही. कारण एखाद्याला सहजपणे आपला डेटिंग पार्टनर मिळतो तर काहींना त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. परंतु आता डेटिंग पार्टनर शोधत असलेल्या मुलांसाठी एक गोड बातमी समोर आली आहे. कारण सोशल मीडियाच्या प्रोफाईलवरील फोटो कुत्र्यांसोबत (Profile Picture with Dogs) असल्यास त्यांना लगेच गर्लफ्रेंड मिळते असे रिसर्चमधून सिद्ध झाले आहे.
दरम्यान, स्पेनमधील युनिव्हर्सिटी ऑफ जेन (University of Jaen) या विद्यापीठाने केलेल्या रिसर्चमधून हा अजब खुलासा करण्यात आला आहे. जी मुले आपल्या प्रोफाईवर कुत्र्यांसोबत फोटो ठेवतात त्यांना लगेच गर्लफ्रेंड अर्थात डेटिंग पार्टनर Dating Partner) मिळतो असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे गर्लफ्रेंडच्या शोधात असलेल्या मंडळीने आपल्या प्रोफाईलवर पाळीव कुत्र्याचा फोटो ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे. हे रिसर्च ३०० वेगवेगळ्या महाविद्यालयीन विद्यार्थीनींवर केले गेले आहे. जी लोक ऑनलाइन डेटिंग ॲपवर कुत्र्यांसोबत फोटो ठेवतात अशा लोकांना मुलींची अधिक पसंती असते.
कुत्र्यासोबत फोटो लावा आणि मिळवा गर्लफ्रेंड
University of Jaen ने केलेल्या रिसर्चमध्ये असे समोर आले की, ज्या ३०० मुलींवर रिसर्च करण्यात आले त्यांनी अशा लोकांना पसंती दिली आहे, ज्यांच्या प्रोफाईल फोटोमध्ये कुत्रा आहे. ऑनलाइन डेटिंग ॲपवर प्रोफाईलवर कुत्रा असलेली मंडळी आम्हाला जास्त आकर्षित करते असा त्यांनी दावा केला. मिररने दिलेल्या वृत्तानुसार, मुलींना काही स्त्री-पुरुष कुत्र्यांसह फिरताना आणि एकटे फिरतानाचे फोटो दाखवण्यात आले होते. या फोटोच्या वेगवेगळ्या पैलूंवर मिळालेल्या उत्तरांचे विश्लेषण केले असता, असे दिसून आले की लहान कुत्र्यांसह प्रोफाईल असलेले मुले मुलींना अधिक आकर्षित करत आहेत.
लहान कुत्रे आकर्षणाचे प्रमुख कारण
मुलींना अंधारात आणि कमी प्रकाशात काढलेले कुत्र्यांचे फोटो दाखवण्यात आले. यामध्ये लहान कुत्रे आणि मोठ्या कुत्र्यांच्याही फोटोंचा समावेश होता. अखेर त्यांनी लहान कुत्र्यांसोबत फोटो असलेल्या मुलांना अधिक प्राधान्य दिले आणि अशी मुले आम्हाला संवेदनशील वाटत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एका मुलीने केलेल्या दाव्यानुसार, हे रिसर्च समोर येताच अनेक मुलांनी लहान कुत्र्यांसोबत प्रोफाईल फोटो ठेवण्यास सुरूवात केली आहे.