कडक सल्यूट ! धावती ट्रेन पकडणं बेतलं जीवावर, पोलिस कर्मचाऱ्याने वाचवले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 01:41 PM2024-04-17T13:41:36+5:302024-04-17T13:44:14+5:30
धावती रेल्वे पकडू नका, त्याने जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. अशा घोषणा आपण दररोज ऐकतो. मात्र, या घोषणा आपण एका कानाने ऐकतो आणि दुसऱ्या कानाने सोडून देतो.
Social Viral : चालत्या गाडीत चढताना किंवा उतराना फलाटामधील अंतराकडे कायम लक्ष असू द्या. तसेच धावती गाडी पकडू नका, त्याने जीवाला धोका असतो. अशा सूचना रेल्वे फलाटावर तुमच्याही कानावर पडल्या असतीलच. पण त्याचं पालन मात्र कोणीही करताना दिसत नाही.
सोशल मीडियावर नियमितपणे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. तसेच अनेकदा रेल्वे अपघाताचेही असंख्य व्हायरल व्हिडिओ, रिल्स या माध्यमातून आपल्या समोर येत असतात. असाच एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, जो पाहून तुमचाही थरकाप उडेल. धावती गाडी पकडणं एका माणसाला चांगलच महागात पडलं आहे. मात्र RPF जवानाच्या प्रसंगावधानामुळे या व्यक्तीला जीवनदान मिळालं आहे.
सध्या इन्स्टाग्रामवर , मृत्यूलाही माघारी परत लावणाऱ्या एका रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ समोर आलाय. ज्याने वेळीच प्रसंगावधान दाखवून एका वयोवृद्ध प्रवाशाचा जीव वाचवला आहे. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील प्रयागराज जंक्शन येथील असल्याची माहिती मिळतेय. मृत्यूच्या दारातून प्रवाशाला परत आणणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव संजय कुमार असं आहे.
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक माणूस अतिघाई करत धावती ट्रेन पकडताना दिसत आहे. त्यावेळी ट्रेनमध्ये चढतानाच अचानक त्यांचा पाय घसरतो आणि ते खाली पडतात. त्याचदरम्यान रेल्वे फलटावर कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने त्यांच्याकडे धाव घेतली. क्षणाचाही विलंब न करता प्रसांगवधान दाखवत त्या कॉन्स्टेबलने त्याचा जीव वाचवला. या रेल्वे अधिकाऱ्याच्या कामाचं सर्व स्तरातून कौतुक होताना दिसतंय.