iPhone साठी उपाशी राहिला! मंदिराबाहेर फुलं विकणाऱ्या आईला मजबूर केलं; डोळ्यात पाणी आणणारा Video
By ओमकार संकपाळ | Published: August 18, 2024 03:08 PM2024-08-18T15:08:50+5:302024-08-18T15:12:12+5:30
आईची तुलना कोणासोबतच केली जाऊ शकत नाही हे सत्य नाकारता येणार नाही.
आई ती आईच असते... आईची तुलना कोणासोबतच केली जाऊ शकत नाही हे सत्य नाकारता येणार नाही. आपल्या लेकराच्या आनंदासाठी ती माऊली आपल्या जीवाची पर्वा न करता झटत असते. पण, प्रत्येक मुलाला आपल्या आईच्या कष्टाची जाणीव असेल असे नाही. याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओ अनोखा असला तरी डोळ्यात पाणी आणणारा नक्कीच आहे. मंदिराबाहेर फुले विकून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या एका महिलेला तिच्या मुलाने महागडा फोन घेऊन देण्यासाठी मजबूर केले. फोन घेत नाही तोपर्यंत उपाशी राहून त्याने फोनची मागणी केली. ही घटना कुठे घडली हे अद्याप स्पष्ट नसले तरी व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, संबंधित माऊलीने मुलाच्या आनंदासाठी एवढ्या कष्टाने कमावलेली रक्कम आनंदाने दिली.
महिलेने सांगितले की, ती एका मंदिराबाहेर फुले विकते. यातून माझ्या मुलाला फोन घेण्यासाठी पैसे साठवले. कारण त्याला फोन हवा होता यासाठी तो तीन दिवस उपाशी राहिला. व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, मुलगा हातात रोख रक्कम घेऊन उभा आहे. त्याला पैसे मिळाल्यावरच तो खुश झाला. मुलाने सांगितले की तो इन्स्टाग्रामवर मोबाईल शॉपचे अकाउंट फॉलो करतो आणि म्हणूनच त्याने त्याच्या दुकानातून फोन खरेदी करण्याचा निर्णय घेतला.
This video is saddening. This boy's mother sells flowers outside a temple. He insisted on buying an iPhone, and went on a hunger strike for 3 days. In the end, the mother gave up and bought him an iPhone with her hard-earned money. Her expression says a lot. 💔 pic.twitter.com/7eAhqcU3pD
— Abhishek (@AbhishekSay) August 18, 2024
दरम्यान, मुलाने कोणता iPhone खरेदी केला हे व्हिडीओमध्ये स्पष्ट होत नाही. मात्र, त्याचा हा पराक्रम पाहून नेटकरी चांगलेच संतापले. अनेकांनी त्या माऊलीप्रती भावनिक प्रतिक्रिया दिल्या. एका युजरने म्हटले की, हा व्हिडीओ दुःखदायक आहे. या मुलाची आई मंदिराबाहेर फुले विकते. पण, त्याने आयफोन घेण्याचा आग्रह धरला, आणि ३ दिवस उपाशी राहिला. शेवटी आईने हार मानली आणि तिच्या मेहनतीने त्याला आयफोन विकत घेतला. आई ती आईच असते... आपल्या मुलाच्या आनंदासाठी ती काहीही करते. मात्र, मुलांनी तिच्या कष्टाची जाणीव ठेवायला हवी.