धाडस की मूर्खपणा...८ सेकंदचा व्हायरल व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल; काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 07:45 AM2023-01-06T07:45:00+5:302023-01-06T07:45:18+5:30
जिप्सीत बसलेल्या एका पर्यटकाने हा प्रकार त्याच्या कॅमेऱ्यात कैद केला. त्यानंतर हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.
पन्ना - जंगलातील वाघ पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक व्याघ्र प्रकल्पाला भेट देतात. वाघ पाहण्याचा थरार काही औरच असतो. जंगल सफारी करत वाघाचं दर्शन घेण्याची अनेकांची इच्छा असते. मात्र मध्य प्रदेशातील एका व्हिडिओनं सध्या सगळीकडे खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ वाघाच्या मागे धावणाऱ्या एका वन कर्मचाऱ्याचा आहे. मध्य प्रदेशातील पन्ना इथं वाघाच्या मागे धावत व्हिडिओ बनवताना वन कर्मचाऱ्याचा व्हिडिओ चर्चेचा विषय बनला आहे.
जीवाची पर्वा न करता घनदाट जंगलात एक कर्मचारी वाघाचा व्हिडिओ बनवताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ पर्यटकाकडून बनवण्यात आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत आपण पाहू शकता की जंगलात पुढे पुढे वाघ त्याच्या मस्तीत चालत आहे. पण त्याच्याच काही अंतरावर मागे बेधडकपणे वन कर्मचारी व्हिडिओ बनवत त्याच्यामागे चालताना दिसतोय. या वन कर्मचाऱ्याच्या मागे असलेल्या जिप्सीत बसलेल्या एका पर्यटकाने हा प्रकार त्याच्या कॅमेऱ्यात कैद केला. त्यानंतर हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.
हा व्हिडिओ पन्ना व्याघ्र प्रकल्पातंर्गत असल्याचं सांगितले जात आहे. परंतु हा व्हिडिओ कधीचा आहे याची पुष्टी करण्यात आली नाही. या व्हिडिओबाबत पन्ना व्याघ्र प्रकल्पाचे विभागीय संचालक बृजेंद्र झा यांना विचारले असता त्यांनीही हा व्हिडिओ आम्ही पाहिला. सोशल मीडियावर हा खूप व्हायरल होत आहे. हा कर्मचाऱ्याचा निष्काळजीपणा आहे. हा व्हिडिओ नेमका कधीचा आणि कुणाचा आहे याबाबत चौकशी करण्याचे आदेश वन विभागाने दिले आहेत.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर नेटिझन्सच्या अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. जीवाची पर्वा न करता या कर्मचारी वाघाचा व्हिडिओ बनवत होता. हे धाडस आहे की मूर्खपणा असा सवाल नेटिझन्स विचारतायेत. तर व्हिडिओ काढण्याची गरजच काय असंही नेटिझन्स म्हणत आहेत. सध्या हा ८ सेकंदचा व्हायरल व्हिडिओ पाहून अनेकांनी वन कर्मचाऱ्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे या बेजबाबदार कर्मचाऱ्यावर वन विभाग काय कारवाई करतं हे पाहणं गरजेचे आहे.