Bihar : 75 वर्षांत पहिल्यांदाच गावातील तरुणाला मिळाली सरकारी नोकरी, गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 02:37 PM2022-09-27T14:37:04+5:302022-09-27T14:37:57+5:30
75 वर्षांत पहिल्यांदाच गावातील तरुणाला सरकारी नोकरी मिळाल्याने गावकऱ्यांनी जल्लोष केला.
पाटणा : सध्या बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अशा स्थितीत जर सरकारीनोकरी मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. सरकारी नोकऱ्यांबाबत उत्तर भारतीयांमध्ये एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. खासकरून बिहारमध्ये तरुणांचा पहिला प्रयत्न सरकारी नोकरीचा असतो. परंतु बिहारमधील एक असेही गाव आहे जिथे स्वातंत्र्यानंतर एकाही व्यक्तीला सरकारी नोकरी मिळाली नाही. पण आता गावातील एका तरुणाने हा विक्रम मोडल्याने गावात जल्लोषाचे वातावरण आहे.
बिहार राज्यातील मुझफ्फरपूर जिल्ह्यातील कटरा ब्लॉकच्या सोहागपूर गावातील तरुणाला पहिल्यांदाच सरकारी नोकरी मिळाली आहे. त्यामुळे तरूणाचे कुटुंबात आणि संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होऊनही गावातील कोणालाही सरकारी नोकरी मिळाली नव्हती. मात्र आता गावातील राकेश कुमार या तरुणाने हा विक्रम मोडून काढला असून तो आता सरकारी शिक्षक झाला आहे.
राकेश कुमार बनला शिक्षक
जवळपास 2,000 लोकसंख्या असलेल्या या गावात आतापर्यंत एकाही तरूणाला सरकारी नोकरी मिळाली नव्हती. राकेश कुमार या तरूणाने मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर इथपर्यंत मजल मारली आहे. राकेशने गावात शिक्षणाची सुरुवात केल्यानंतर जिल्हा दरभंगा विद्यापीठातून एमकॉमचे (MCom) शिक्षण घेतले आणि त्यानंतर राजस्थानमधून बीएडची (B.Ed) परीक्षा उत्तीर्ण झाला.
गावकऱ्यांनी केला जल्लोष
राकेश कुमारच्या या यशामुळे गावातील नागरिक खूप खुश आहेत. भारताच्या स्वातंत्र्यानंतर आपल्या गावातील तरूणाला सरकारी नोकरी मिळाल्याचा गावकरी आनंद साजरा करत आहेत. तसेच राकेशच्या या यशामुळे इतर तरूणांना देखील प्रेरणा मिळेल असे गावकरी सांगत आहेत. राकेश कुमार याची नियुक्ती मुझफ्फरपूर जिल्ह्यातील तुर्कीच्या प्राथमिक शाळेत झाली आहे, जिथे तो विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम करेल.