"Miss You ..." ब्लड कॅन्सरने मृत्यू पावलेल्या विद्यार्थिनीने शिक्षकांसाठी लिहिलं भावनिक पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 01:32 PM2024-07-06T13:32:43+5:302024-07-06T13:35:28+5:30
"ही आवडते मज मनापासूनी शाळा; लाविते लळा ही जसा माऊली बाळा..." या ओळी कानावर पडताच क्षणी डोळ्यांसमोर जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेचं चित्र उभं राहतं.
Social Viral : "ही आवडते मज मनापासूनी शाळा; लाविते लळा ही जसा माऊली बाळा..." या ओळी कानावर पडताच क्षणी डोळ्यांसमोर जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेचं चित्र उभं राहतं. शाळेच्या दगडी भिंती तसेच कौलं किंवा सिमेंटचे पत्रे, शाळेचं पटांगण आणि शाळेच्या नावाच्या पाटी या सर्व आठवणी अगदी ताज्या होतात. तसं म्हणायला गेल्यास प्रत्येकाच्या शाळेच्या बाबतीत आठवणीही वेगळ्याच, आणि त्यात जिल्हा परिषदेची शाळा म्हटली तर आपसुकच जिव्हाळ्याचं नातं निर्माण होत. अशाच एका शाळकरी मुलीचं व्हायरल होणारं पत्र सध्या चर्चेत आलं आहे. ब्लड कॅन्सरचं निदान झालेल्या एका लहान मुलीचा शाळेच्या आठवणींनी जीव तुटतो. त्या लहानग्या चिमुरडीने आपल्या भावना कागदावर उतरवल्या आहेत. त्याचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
जिल्हा परिषद शाळेतील ब्लड कॅन्सरने मृत्यू पावलेल्या विद्यार्थिनीचे शिक्षकांसाठीचे पत्र.💔
— गब्बर सिंग. (@Gabbar_Siingh) July 4, 2024
जे नातं जि. प. विद्यार्थी आणि शिक्षक यांच असतं ते आजकाल दुसर्या शाळेत बघायला नाही भेटत.
निशब्द 🙏🥹 pic.twitter.com/p7vPFHIIbh
एका जिल्हा परिषद शाळेतील ब्लड कॅन्सरने मृत्यू पावलेल्या विद्यार्थिनीने शिक्षकांसाठीचे लिहिलेलं हे पत्र आहे. त्यात तिने लिहंलय- " टिचर मी तुमची मानसी. टिचर मला क्षणाक्षणाला तुमची आठवण येते. शेवाळे टिचर इतिहास, भूगोल व हिंदी खूप छान शिकवायच्या. सोनावणे टिचर मराठी, इंग्रजी शिकवण्याच्या बाबतीत गुणवान होत्या, आणि आमचे नाव पाडणारे ठाकरे सर गणित, विज्ञान शिकवायचे. शिकवायच्या बाबतीत ते आमचे देवचे होते. मला परत परत मानसा आक्का म्हणणाऱ्या ठाकरे सरांची खूप खूप आठवण येते. टिचर मला एकच बोलत होते की, तुम्ही सहल दिपावलीच्या आत काढायला पाहिजे होती, कारण की सहलीला मी ही आली असती. परंतु मी दिपावलीच्या नंतर आजारी पडले. माझ्या गळ्याला सुज आली. मला माझ्या पप्पांनी माळेगावला टाकलं कि त्या डॉक्टरांनी ८ दिवसांचे मेडेसीन दिले. परंतु मला गुण आलाच नाही. मग घरचे सगळे घाबरले की दुसरी गाठ असेल. मग आम्ही म्हणजे पप्पा मी आणि आत्याचे मिस्टर मग नाशिकला गेलो. तिथे माझा एम आर आय केला. तिथे ही गुण आला नाही. मग आम्ही मुंबईला गेलो. मुंबईला ४ ते ५ जिवस राहिलो मग त्यांनी माझा सीटी स्कॅन केला. दुसऱ्या वेळी इंजोग्राफी केली. मग तिसऱ्यांदा आम्हाला फक्त तपासायला बोलावले. मग चौंथ्यांदा फायनल ऑपरेशन सांगितलं. २०तारखेला आम्ही मुंबईला गेलो. ते म्हणे तुम्ही घाटकोपरला जा आणि शेवटचा स्कॅन करा मग आम्ही गेलो. तिथला रिपोर्ट आला की बाळाला कॅन्सर झाला. मग दुसऱ्या दिवशी मला पप्पांनी छान ड्रेस घेतला, बुट घेतले. घड्याळ घेतलं आणि मग आम्ही घरी आलो.फार फार आठवण येते शाळेची. नाविलाज आहे माझा". "Miss You Teacher and Sir ..."
@Gabbar_Siingh नावाच्या एक्स अकाउंटवरून या पत्राचा फोटो शेअर करण्यात आला आहे. हे पत्र वाचून काहींना तर आपले अश्रू अनावर झाले आहेत. "अक्षरशः डोळ्यात पाणी आले वाचून" त्यासोबतच "निःशब्द आहे" अशा कमेंट नेटकऱ्यांनी या पोस्टवर केल्या आहेत. दरम्यान, हे व्हायरल होणारं पत्र कोणी लिहलंय याबाबत काहीही माहिती समोर आलेली नाही.