भारतीय वैमानिकांना सलाम! भर वादळात साऱ्यांनीच हार मानली, तेव्हा आपल्या पायलट्सने केलं ‘सेफ लँडिंग’
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 03:39 PM2022-02-20T15:39:32+5:302022-02-20T15:40:41+5:30
एअर इंडियाच्या या विमानाने वाऱ्याशी झुंज देत यशस्वी लँडिंग केल्याने प्रत्येक भारतीयाला या पायलट्सचा अभिमान वाटत आहे.
नवी दिल्ली: विमानाचा प्रवास जेवढा सुखकर, आरामदायी असतो, तेवढाच तो धोकादायकही असतो. यातच ब्रिटन सध्या गेल्या ३० वर्षांतील सर्वांत मोठ्या वादळाचा सामना करत आहे. युनिस वादळ ब्रिटनमध्ये धडकल्यापासून सर्वत्र परिस्थिती अनियंत्रित झाली आहे. अशावेळी लंडनमधील हिथ्रो विमानतळावर विमानांचे लँडिंग करणेही कठीण झाले आहे. मात्र, एका भारतीय पायलटने संयम आणि धाडस दाखवत विमान सुखरुपपणे लँड केले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
अत्यंत धोकादायक युनिस वादळात एअर इंडियाच्या विमानाने एवढं नेत्रदीपक लँडिंग केलं आहे की, प्रत्येकजण त्या विमानाच्या पायलटचे कौतुक करताना दिसत आहे. व्हायरल व्हिडीओमध्येही बिग जेट टीव्हीचे संस्थापक जेरी डायर्स हे ‘विमान नीट उतरू शकेल की नाही हे मला पाहायचे आहे,’ असे म्हणताना ऐकू येत आहे. व्हिडिओमध्ये पायलटला यश आलेले दिसते. हे अत्यंत कुशल भारतीय पायलट आहेत, असे म्हणत अनेकांनी पाठही थोपटली आहे.
प्रत्येक भारतीयाला अभिमान
एअर इंडियाच्या विमानाने वाऱ्याशी झुंज देत यशस्वी लँडिंग केल्याने प्रत्येक भारतीयाला या पायलट्सचा अभिमान वाटत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून, त्या पायलटचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. व्हिडिओ शेअर करताना, एका यूजरने म्हटलेय की, तो खूप कुशल पायलट आहे. एअर इंडियाच्या पायलटने B787 ड्रीमलायनर विमान हिथ्रो विमानतळावर यशस्वीरित्या उतरवले आहे. जेव्हा इतर अनेक विमाने उतरू शकली नाहीत, जेव्हा अनेक उड्डाणे रद्द करावी लागली तेव्हा भारतीय पायलटला हे यश मिळाले.
दरम्यान, एअर इंडियाच्या एक नाही, तर दोन विमानांनी वादळाशी दोन हात करत यशस्वी लँडिंग केली आहे. एक AI147 हे हैदराबादहून आले होते, तर दुसरे AI145 गोव्याहून आले होते. दोन्ही विमानांनी पहिल्याच प्रयत्नात यशस्वी लँडिंग केले. माहितीनुसार AI147 विमानाचे कमांडर कॅप्टन अंचित भारद्वाज होते, तर AI145 विमानाचे कमांडर कॅप्टन आदित्य राव होते. दोन्ही पायलटच्या या यशस्वी लँडिंगमुळे एअर इंडियाही खूप उत्साहित आहे. ब्रिटिश एअरवेज आणि कतार एअरवेजच्या विमानांना लँडिंग करताना खूप अडचणी येत होत्या, पण आमच्या पायलटनी अतिशय अचूक आणि उत्कृष्ट लँडिंग स्कील दाखवले. ते सर्व उच्च प्रशिक्षित आहेत, असे एअर इंडियाकडून सांगण्यात आले आहे.
Air India Flight lands safely in London in the middle of ongoing Storm Eunice . High praise for the skilled AI pilot. 😊🙏👍🥰 @airindiainpic.twitter.com/yyBgvky1Y6
— Kiran Bedi (@thekiranbedi) February 19, 2022