फूट ओव्हर ब्रिजखाली अडकलं Air India चं विमान; Social Media वर व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 01:54 PM2021-10-04T13:54:40+5:302021-10-04T13:55:48+5:30
Air India Viral video : सध्या एअर इंडियाच्या विमानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर (Social Media) सध्या एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. रविवारी एक व्हिडीओ व्हायरल झाला, ज्यामध्ये दिल्ली विमानतळाच्या बाहेर दिल्ली-गुरुग्राम हायवेवर असलेल्या एका फूट ओव्हर ब्रीजच्या खाली एअर इंडियाचं एक विमान अडकलेलं दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आणि ते विमान त्या ठिकाणी कसं पोहोचलं हा प्रश्नही पडला.
खरं तर या विमानाचा अपघात झालेला नाही. परंतु हे विमान खराब झालेलं आहे. जे विमान एअर इंडियानं (Air India) विकून टाकलं आहे. तसंच हे विमान ज्यानं खरेदी केलं, त्या मालकाद्वारे नेण्यात येत होतं. "हे एक जुनं विमान आहे आणि ते खराब झालं होतं. त्याची आम्ही पूर्वीच विक्री केली होती. याबाबत कोणतीही अतिरिक्त माहिती नाही, कारण ज्याला याची विक्री केली होती तोच हे विमान घेऊन जात होता," अशी प्रतिक्रिया एअर इंडियाच्या प्रवक्त्यानं दिल्याची माहिती टाईम्स ऑफ इंडियानं दिली आहे.
#WATCH An @airindiain plane ✈️ (not in service) got stuck under foot over bridge. Can anyone confirm the date and location?
— Ashoke Raj (@Ashoke_Raj) October 3, 2021
The competition starts now👇 pic.twitter.com/pukB0VmsW3
जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्यामध्ये गाड्या हायवेच्या एका बाजूनं जाताना दिसत आहे. तर दुसरीकडे विमान अडकल्यामुळे ट्रॅफिक पुढे जाण्यास अडथळा निर्माण झाल्याचंही दिसत आहे. विमानाचा पुढचा आणि मधला भाग फूट ओव्हर ब्रीजच्या खालून पुढे गेला परंतु मागील भाग ब्रीजखाली अडकल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, हे कंपनीच्या ताफ्यात असलेल्या विमानांशी संबंधित विमान नाही. या व्हिडीओमध्ये विमान विना विंग्सचं नेलं जात आहे. हे नेण्यात ड्रायव्हरची चूक असून त्यामुळेच ते अडकलं आहे, अशी प्रतिक्रिया दिल्ली विमानतळाच्या एका अधिकाऱ्यानं दिली.