आता मानवाच्या मूत्रावरही चालणार वाहने; 'या' कंपनीने विकसित केले अनोखे तंत्रज्ञान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 10:25 AM2022-07-30T10:25:21+5:302022-07-30T10:26:44+5:30
भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत.
नवी दिल्ली : भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. इंधनाच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. कच्चा तेलाच्या वाढलेल्या भावामुळे इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे बोलले जात आहे. मात्र यावर रामबाण उपाय म्हणून जर मानवाच्या मूत्रावर वाहने धावू लागली तर आश्चर्य वाटून घेऊ नका. साहजिकच यावर विश्वास ठेवणे कठीण आहे मात्र हे सत्य आहे. कारण अमेरिकेतील एका कंपनीने आपल्या अनोखे तंत्रज्ञान विकसित करून सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
इंधनाशिवाय चालणार वाहने
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे जगभरातील सरकारे आणि कंपन्या इंधनावर उपाय काही इतर मार्ग शोदत आहेत. रस्त्यावर धावणाऱ्या गाड्या इंधनाशिवाय कशा धावतील यावर विचारविनिमय सुरू आहे. मात्र मानवाच्या मूत्रावर देखील वाहने धावू शकतात असे अमेरिकेतील एका कंपनीने सिद्ध केले आहे. अमेरिकन कंपनी अमोगी (American company Amogi)या कंपनीने अमोनियाद्वारे ट्रॅक्टर चालवून दाखवला आहे. विशेष म्हणजे मानवाच्या मूत्रामध्ये मुबलक प्रमाणात अमोनिया आढळतो.
दरम्यान, जगभरात इंधनाचा तुटवडा भासत आहे मात्र मानवी मूत्राचा तुटवडा कधीच भासणार नाही असे कंपनीचे म्हणणे आहे. म्हणजेच लोकांना आता मूत्राद्वारे देखील ट्रॅक्टर चालवता येणार आहे. त्यामुळे आगामी काळात अमोनियाचा इंधन म्हणून वापर केल्यास ते फायदेशीर असल्याचा दावा केला जात आहे.
जहाजांवरही करणार प्रयोग
माहितीनुसार, संबंधित कंपनीने अमोनिया तोडणारी अणुभट्टी तयार केली आणि त्यातून ऊर्जा निर्माण करण्यासाठी हायड्रोजनचा वापर केला आहे. त्यामुळे आपण मानवी मूत्राचा थेट इंधन म्हणून वापर करू शकत नाही कारण ते इंधनायोग्य होण्यासाठी काही प्रक्रिया होणे आवश्यक आहे. रिपोर्टनुसार, लघवीला अमोनियामध्ये बदलले जाऊ शकते आणि नंतर त्याचा वापर ऊर्जा निर्माण करण्यासाठी केला जाऊ शकतो. कंपनीने सध्या या तंत्रज्ञानाचा उपयोग फक्त ट्रॅक्टर चालवण्यासाठी केला आहे. परंतु आगामी काळात हे अनोखे तंत्रज्ञान समुद्रातील जहाजही चालवणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.