अमरावतीच्या ऑटोवाल्या आजोबांची फर्राटेदार इंग्लिश... अॅसेंट पाहून तोंडात बोटे घालाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 02:06 PM2024-07-12T14:06:15+5:302024-07-12T14:09:37+5:30
सोशल मीडिया म्हणजे माहितीचं भांडार आहे.
Social Viral :सोशल मीडिया म्हणजे माहितीचं भांडार आहे. जगाच्या पाठीवर कुठं काय घडतंय याची पुरेपूर माहिती येथे सहज उपलब्ध होते. सध्या इंटरनेटवर महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील एका वयस्क रिक्षाचालकाचा व्हिडिओ चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये रिक्षावाले आजोबा इंग्रजी भाषेत समोरील व्यक्तीसोबत संवाद साधताना दिसत आहेत. ऑटो चालक आजोबा दोन तरुणांना इंग्रजीचे महत्त्व पटवून सांगतात.
दरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यमातून या रिक्षाचालक व्यक्तीचे नेटकरी तोंडभरून कौतुक करताना दिसत आहेत. या व्हायरल व्हिडिओमध्ये रिक्षाचालक आजोबा इतरांना इंग्रजी भाषा शिकण्याचा सल्ला देत आहेत. वेगवेगळी उदाहरणे देत ते या तरुणांना इंग्रजीचं महत्व समजावत आहेत. शिवाय तुम्हाला जर इंग्रजी भाषेतून संवाद साधत येत असेल तर तुम्ही लंडन, अमेरिका तसेच पॅरिस यांसारख्या देशांमध्ये फिरु शकता, असं त्यांचं म्हणणं आहे.
सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या साईट्सवर या रिक्षाचालक काकांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसतोय. त्यात हे काका अगदी सहजतेने आपल्या प्रवाशासोबत इंग्रजीत बोलत आहेत. त्याचबरोबर त्यांचा इंग्लिश अॅसेंट पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये रिक्षाचालक आजोबा म्हणतात,"मी जे काही सांगतोय ते लक्षपूर्वक ऐका. तुम्हाला जर इंग्रजी भाषेतून संवाद साधता येत असेल तर तुम्ही लंडन, अमेरिका तसेच पॅरिस यांसारख्या देशांमध्ये फिरु शकता. तुम्हाला इंग्रजी येत नसेल तर परदेशात जाता येणार नाही. लंडनमधील कोणत्याही हॉटेलमध्ये तुम्ही गेलात आणि तिथे इंग्रजी ऐवजी तुम्ही मराठीत बोलू लागलात तर तेथील वेटर तुम्हाला बाहेर हाकलून देईल. यासाठीच मी तुम्हाला सांगतोय इंग्रजीत बोलायला शिका कारण ती आपली आंतरराष्ट्रीय भाषा आहे".
हा व्हिडिओ नेटकऱ्यांचा चांगलाच पसंतीस उतरला आहे. शिवाय सोशल मीडिया यूजर्सनी व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.