धक्कादायक! राजस्थानमध्ये संपूर्ण कॉलनी चोरीला गेली; खिडक्या-दारांसह ३७२ घरे गायब
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 05:18 PM2023-09-28T17:18:06+5:302023-09-28T17:19:06+5:30
राजस्थानच्या झालावाडमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे.
राजस्थान येथील झालावाडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या ठिकाणी गृहनिर्माण मंडळाने बांधलेल्या ३७२ घरांची संपूर्ण वसाहत चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी या वसाहतीत बांधलेल्या घरांच्या खिडक्या आणि दरवाजेच नाही तर विटा, अन्य साहित्यही चोरून नेले आहे. आठ महिन्यांत ही संपूर्ण घटना घडली. या वसाहतीत घरे खरेदी केल्यानंतर लोकांनी गृहनिर्माण मंडळाकडून ताबा घेतला होता. मात्र, आजपर्यंत या वसाहतीत एकही खरेदीदार राहायला आलेला नाही. या घटनेची चर्चा जोरदार सुरू आहे.
100 किलो भांग खाऊन मेंढ्या झाल्या 'टल्ली' आणि मग झालं असं काही...
प्रकरण झालावाडच्या अकलेरा येथील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गृहनिर्माण मंडळाने येथे एकूण ३७२ घरांची वसाहत बांधली होती. त्याचे बांधकाम सन २०१२-१३ मध्ये पूर्ण झाले. यानंतर हाऊसिंग बोर्डाने लिलाव करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळी खरेदी केलेला एकही व्यक्ती आला नाही. २०१९ मध्ये गृहनिर्माण मंडळाने या सर्व घरांच्या किमतीत ५० टक्के सूट देऊन पुन्हा लिलाव केला. यामध्ये जवळपास सर्व घरांची विक्री झाली.
ही वसाहत शहरापासून दूर असल्याने खरेदी करणाऱ्यांनी ताबा घेतल्यानंतर कुलूप लावून ठेवले. घर खरेदी केलेल्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते वेळोवेळी त्यांची घरे पाहण्यासाठी येत होते. या वर्षी जानेवारी अखेरपर्यंत सर्व काही ठीक होते, पण आता एक व्यक्ती कॉलनीत पोहोचला तेव्हा सर्व घरे गायब होती. वसाहतीच्या जागेवर काही भंगार पडलेले आहे. चोरट्यांनी येथे बांधलेली घरे फोडून फक्त खिडक्या आणि दरवाजेच नाही तर विटा आणि अन्य साहित्यही पळवल्या.
आता सर्वांचे प्लॉटही गायब झाले आहेत. कोणाचे घर कोणत्या जागेवर बांधले आहे हे कोणालाच माहीत नाही. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, या घटनेबाबत त्यांना कोणतीही माहिती नाही. याप्रकरणी अद्याप कोणीही लेखी तक्रार दिलेली नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की, बोर्डाने ताबा दिला होता, त्यामुळे घरांची देखभाल करण्याची जबाबदारी घर खरेदीदारांवर होती. या वसाहतीत अनेकांनी एकापेक्षा जास्त घरे खरेदी घेतली होती, मात्र कोणीही राहायला आले नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच काही लोकांनी स्वत:हून ही घरे पाडली होती आणि ते आपल्या पद्धतीने येथे पुन्हा बांधणार होते.