महिंद्राच्या सेल्समननं अपमानित केलेल्या 'त्या' शेतकऱ्यासाठी आनंद महिंद्रांचं खास ट्विट; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 12:16 PM2022-01-29T12:16:38+5:302022-01-29T12:21:35+5:30

खिशात १० रुपये तरी आहेत का? असा सवाल करत महिंद्रा डिलरशिपमधील सेल्समननं उडवली होती शेतकऱ्याची खिल्ली

Anand Mahindra joins in welcoming Karnataka farmer to mahindra and mahindra family | महिंद्राच्या सेल्समननं अपमानित केलेल्या 'त्या' शेतकऱ्यासाठी आनंद महिंद्रांचं खास ट्विट; म्हणाले...

महिंद्राच्या सेल्समननं अपमानित केलेल्या 'त्या' शेतकऱ्यासाठी आनंद महिंद्रांचं खास ट्विट; म्हणाले...

googlenewsNext

महिंद्रा शोरुममधील सेल्समनकडून अपमान झालेल्या कर्नाटकमधील शेतकऱ्यासाठी उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी खास ट्विट केलं आहे. शेतकरी केम्पेगौडा आर एल यांचं आनंद महिंद्रा यांनी महिंद्रा एँड महिंद्रा परिवारात स्वागत केलं आहे. केम्पेगौडा यांना देण्यात आलेल्या अपमानास्पद वागणुकीवरून कंपनीनं आपली अधिकृत भूमिका एका निवेदनाच्या माध्यमातून मांडली. केम्पेगौडा यांना झालेल्या गैरसोयीबद्दल कंपनीनं खेद व्यक्त केला.

महिंद्रा ऑटोमोटिव्हनं ट्विटरवर एक अधिकृत निवेदन जारी करत केम्पेगौडा यांची माफी मागितली. 'केम्पेगौडा आणि त्यांच्या मित्रांना २१ जानेवारीला आमच्या डिलरशिपकडून त्रास झाला, त्याबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो. याबद्दल योग्य पावलं उचलण्याचं वचन आम्ही दिलं होतं. त्याप्रमाणे आम्ही योग्य पावलं उचलली आहेत आणि आता हा वाद मिटला आहे,' असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. 

'केम्पेगौडा आमच्यासोबत आहेत. त्यासाठी आम्ही त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. महिंद्रा कुटुंबात आम्ही त्यांचं स्वागत करतो,' असं महिंद्रा ऑटोमोटिव्हनं ट्विटमध्ये म्हटलं. या ट्विटला महिंद्राचे सीईओ आनंद महिंद्रा यांनी रिट्विट केलं. मीदेखील केम्पेगौडा यांचं स्वागत करतो, असं आनंद महिंद्रा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

नेमकं काय घडलं होतं?
कर्नाटकच्या तुमकूरमध्ये वास्तव्यास असलेले शेतकरी केम्पेगौडा त्यांच्या मित्रासोबत एका महिंद्राच्या शोरुममध्ये गेले होते. कार खरेदीसाठी गेलेल्या केम्पेगौडा यांचे कपडे पाहून तिथल्या सेल्समननं त्यांना हटकलं. त्यांचा अपमान केला आणि त्यांना तिथून निघून जाण्यास सांगितलं.

केम्पेगौडा एसयूव्ही बुक करण्यासाठी शोरुममध्ये गेले होते. मात्र सेल्समननं त्यांची खिल्ली उडवली. केम्पेगौडा यांनी महिंद्रा बुलेरोची माहिती घेतली. दोन लाख डाऊनपेमेंट आणि त्याच दिवशी डिलेव्हरी देण्यासंदर्भात चर्चा सुरू होती. सेल्स टीमनं त्यास नकार दिला. त्यावर १० लाख रुपये एकरकमी भरतो असं केम्पेगौडा यांनी म्हटलं. यावरून सेल्स टीमनं जाणूनबुजून त्यांची थट्टा केली.

१० लाख दूर राहिले. तुमच्या खिशात १० रुपयेदेखील नसतील, असं म्हणत सेल्समननं केम्पेगौडा यांची खिल्ली उडवली. अर्ध्या तासात १० लाख रुपये रोख आणल्यास आजच गाडीची डिलिव्हरी करू, असं सेल्समन म्हणाला. त्यानंतर केम्पेगौडा यांनी लगेचच त्यांच्या मित्रांना रोख रकमेची व्यवस्था करण्यास सांगितलं. अर्ध्या तासाच्या आत त्यांनी १० लाख रुपये जमवले. मात्र त्यानंतर सेल्स टीमनं कार डिलिव्हरीसाठी किमान ३ दिवस लागतील असं सांगितलं.

 

Web Title: Anand Mahindra joins in welcoming Karnataka farmer to mahindra and mahindra family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.