लय भारी! चिनी वस्तूंचा यायचा राग म्हणून बापानं लेकीसाठी स्वत: तयार केली कार; पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2020 02:18 PM2020-11-16T14:18:42+5:302020-11-16T14:27:45+5:30
Viral News in Marathi : महाराष्ट्राच्या पिंपरी-चिंचवड भागात राहणाऱ्या ६ वर्षांची तंजीला जेव्हा आपल्या कुटुंबासह मुंबईला गेली तेव्हा तिथल्या मॉलमध्ये टॉय कार तिला खूप आवडली.
कोरोनाच्या माहामारीत भारतभरात चीनी वस्तूंना अनेक ठिकाणी विरोध करण्यात येत आहे. यावेळी दिवाळीसाठी सुद्धा लोकांनी जास्तीत जास्त स्वदेशी बनावटीच्या वस्तू विकत घेण्यास प्राध्यान्य दिलं. अनेक ठिकाणी कोरोनाच्या प्रसाराच्या सुरूवातीला चीनी वस्तूंची होळी करण्यात आली होती. आज आम्ही तुम्हाला अशीच एक घटना सांगणार आहोत. महाराष्ट्राच्या पिंपरी-चिंचवड भागात राहणाऱ्या ६ वर्षांची तंजीला जेव्हा आपल्या कुटुंबासह मुंबईला गेली तेव्हा तिथल्या मॉलमध्ये टॉय कार तिला खूप आवडली. कार पाहिल्या पाहिल्या ही चिमुरडी गाडी घेऊन देण्यासाठी बाबांकडे हट्ट करू लागली.
तंजीलाचे वडील जावेद शेख यांनी बाजारात या कारची चौकशी केली. त्या कारची किंमत साठ हजार रुपयांपर्यंत होती. कारच्या किमतीपेक्षा ती कार चीनी बनावटीचे असल्याचे जावेद यांना खटकले. पण मुलीचा हट्ट तर पुरवायलाच हवा. यासाठी त्यांनी अनोखी शक्कल लढवली. जावेदसह त्यांचे 55 वर्षांचे वडील हुसेन शेख हे चिनी उत्पादन वापरण्याच्या विरोधात आहेत. याशिवाय चीनने कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी ज्या प्रकारे वागणूक दिली आणि जगभरातील टीकेची पर्वा केली नाही, त्यामुळे वडील-मुलाचे मनही अस्वस्थ झाले. म्हणूनच त्यांचा पूर्ण भर ‘मेक इन इंडिया प्रॉडक्ट्स’ खरेदी करण्यावर दिला आहे.
बापरे! ७ महिन्यांपासून पोटातून येत होता रिंगटोनचा आवाज; डॉक्टरांनी सर्जरी केली अन् मग....
तंजीलला मॉलमध्ये पाहिलेल्या कार सारखीच चकाकती, आकर्षक कार हवी होती. याचा विचार करून जावेद यांनी स्वतः कार बनवून द्यायचं ठरवलं. जावेद हे ऑटोमोबाइल रिपेअर गॅरेज चालवतात. येथे कार दुरुस्तीबरोबरच पेंटिगचेही काम केले जाते. जावेद यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी शहरातील एका मोठ्या कार रिपेअर आणि मेंटन्सस हाऊसमध्ये १० वर्ष काम केलं होतं. लेकीसाठी कार बनवण्यासाठी त्यांनी एका कागदावर कारचं चित्र काढलं. त्यानंतर कारसाठी आवश्यक सर्व वस्तू जमा केल्या. लॉकडाऊनमुळे कार तयार करण्यासाठी जावेद आणि त्यांच्या वडिलांकडे बराच रिकामा वेळ होता. यासाठी दोघांनीही कार तयार करण्यावर भर दिला. या कारला टू व्हिलरचं इंजिन लावण्यात आलं होतं.
Diwali 2020 : लय भारी! फ्रान्सच्या नागरिकांनी चक्क मराठीत दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा; पाहा व्हिडीओ
त्यानंतर पॉवरफूल लाइट्स, सीट, बॅटरी, मऊ कुशन असणारी स्टेअरिंगसह नवी कोरी कार तयार झाली. पिंपरी चिंचवडमधील रहिवासी या कारचं कौतुक करत आहेत. विशेष म्हणजे लहान मुलंच नाही तर मोठी माणसंसुद्धा या कारमध्ये बसू शकतात. या कारमुळे तंजीला खूप खूश आहे. जावेदने सांगितले की, ते या छोट्याशा कारमधून घरासाठी लागणारी भाजी किंवा किराणा या गाडीत बसून घेऊन येतात. आता दुसरे लोकही जावेद यांना आपल्या लहान मुलांसाठी कार बनवून देण्यासाठी ऑर्डर्स देत आहेत.