अजब प्रेम! अंजूला परदेशात नोकरीसाठी पासपोर्ट मिळाला, आता पाकच्या प्रियकराशी केला निकाह
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 12:01 PM2023-07-26T12:01:06+5:302023-07-26T12:02:43+5:30
राजस्थानच्या भिवडी येथे राहणारी ३५ वर्षीय अंजू मीना तिच्या फेसबुक मित्र नसरुल्लाहसोबत पाकिस्तानात पोहोचली आहे.
एका नाट्यमय वळणात, फेसबुक मित्रासाठी पतीला आणि दोन्ही मुलांना खोटे सांगून पाकच्या खैबर पख्तुनख्वा येथे गेलेल्या राजस्थानच्या अंजूने इस्लाम धर्म स्वीकारत पाकिस्तानी प्रियकर नसरुल्लाहशी लग्न केले असून तिचे फातिमा असे नाव ठेवण्यात आले आहे.
पाकिस्तानी वृत्तपत्रानुसार, स्थानिक न्यायालयात या जोडप्याने निकाह केला. स्वेच्छेने पाकमध्ये आली असून येथे खूप आनंदी आहे, स्वतःच्या इच्छेने निकाह केला आहे असे अंजूने कोर्टात सांगितले. सुरक्षेच्या कारणास्तव, अंजूला पोलिस बंदोबस्तात कोर्टातून तिच्या नवीन सासरच्या घरी नेण्यात आले.
लग्नानंतर, दोघांनी ‘अंजू वेड्स नसरुल्ला’ नावाचा व्हिडीओदेखील जारी केला असून तो व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये दोघे हात धरून निसर्गरम्य स्थळांना भेट देताना दिसत आहेत.
दुसरीकडे राजस्थानमधील अंजूचा पती अरविंद यांना पत्नी लवकरच परतेल अशी आशा होती. अंजू आणि नसरुल्लाहची २०१९ मध्ये फेसबुकद्वारे मैत्री झाली होती. ती मानसिकरीत्या अस्वस्थ आहे, परंतु तिचे अफेअर नाही असे अंजूच्या वडिलांनी म्हटले होते.
एक दिवसापूर्वीच, २० ऑगस्टला व्हिसा संपल्यावर भारतात परतेन, असे अंजूने सांगितले होते. लग्नाचा विचार नसल्याचे नसरुल्लाहनेही म्हटले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दोघांच्या लग्नाचे वृत्त आल्याने आधीपासून गाजत असलेल्या सीमा हैदर प्रकरणाशी तुलना करीत नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
अंजूचा पती अरविंद हाही भिवडीतील एका खासगी कंपनीत काम करतो. अरविंदने सांगितले की, अंजूला परदेशात नोकरीसाठी २ वर्षांपूर्वी बनवलेला पासपोर्ट मिळाला होता. चार दिवसांपूर्वी जयपूरला जाणार असल्याचे सांगून ती भिवडीहून निघाली होती. यानंतर तिने व्हॉट्सअॅप कॉलवर सांगितले की ती लाहोरला पोहोचली आहे.
२१ जुलै २०२३ रोजी अंजू पाकिस्तानात पोहोचली. अरविंद २००५ पासून भिवडी येथे राहतो. अरविंदला दोन मुले आहेत, तो अंजू आणि अंजूच्या भावासोबत भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहतो.
अंजूने सांगितले की, मी कामानिमित्त फेसबुकचा वापर सुरू केला होता. त्यादरम्यान नसरुल्लाहशी माझा संवाद सुरू झाला. आधी फेसबुकवरून व्हायचे, नंतर नंबर्सची देवाणघेवाण झाली आणि व्हॉट्सअॅपवर संभाषण सुरू झाले. नसरुल्लाला मी दोन-तीन वर्षांपासून ओळखतो. हे मी पहिल्याच दिवशी माझ्या बहिणीला आणि आईला सांगितले.
पाकिस्तानात गेल्यावर अंजू काय म्हणाली?
पाकिस्तानात गेल्यानंतर अंजू म्हणाली की, मी सतत मुलांशी बोलत असते. तिला पतीपासून वेगळे व्हायचे आहे का असे विचारले असता? यावर उत्तर देताना म्हणाली की, होय, तसे आहे. आम्ही सुरुवातीपासून चांगल्या अटींवर नाही. मी त्यांच्यासोबत राहत होतो ही माझी मजबुरी होती. म्हणूनच मी माझ्या भावाला आणि वहिनीला माझ्याजवळ ठेवले आहे.