Video - ही दोस्ती तुटायची नाय! दुसऱ्या महायुद्धात वेगळ्या झालेल्या मित्रांची 75 वर्षांनी झाली भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 05:47 PM2022-10-25T17:47:39+5:302022-10-25T17:54:28+5:30
95 वर्षीय डॉक्टर आजोबांना दुसऱ्या महायुद्धाच्या 75 वर्षांनंतर त्यांच्या जिवलग मित्राला पुन्हा भेटण्याची संधी मिळाली.
कधी कधी अचानक आपल्याला आपल्या अत्यंत जवळची व्यक्ती भेटते. अनेकवेळा एखादी व्यक्ती अचानक खूप दिवसांनी आपल्या ओळखीच्या व्यक्तीला भेटते तेव्हा तो क्षण खूप भावूक असतो. पण जर तुम्ही एखाद्याला तब्बल 75 वर्षांनंतर भेटलात तर तुम्हाला कसं वाटेल. दोन मित्र इतक्या वर्षांनी भेटल्याची अशीच एक घटना आता समोर आली आहे. हे दोन मित्र दुसऱ्या महायुद्धात एकत्र होते.
मित्रांच्या भेटीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील एका व्यक्तीने इन्स्टाग्रामवर एका हृदयस्पर्शी पोस्टद्वारे संपूर्ण गोष्ट सांगितली आहे. व्हिडिओमध्ये एरिन शॉ नावाच्या एका इन्स्टाग्राम युजर्ने लिहिलं की, प्रेम आणि मैत्री काहीही सहन करू शकते. लष्करातील दिग्गजांना भेटताना आणि एकमेकांना मिठी मारताना व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.
माझ्या 95 वर्षीय डॉक्टर आजोबांना दुसऱ्या महायुद्धाच्या 75 वर्षांनंतर त्यांच्या जिवलग मित्राला पुन्हा भेटण्याची संधी मिळाली. माझ्या आजोबांना ओकिनावा येथे पाठवल्यानंतर, ते दोघे वेगळे झाले आणि त्यांना माहीत नव्हते की ते जिवंत आहेत. आमचं कुटुंब सोशल मीडियामुळे एकमेकांना शोधू शकलं असं म्हटलं आहे.
यानंतर एक तारीख निश्चित झाली आणि नंतर दोघे भेटले. दोघांची भेट होताच दोघे भावूक झाल्याचे व्हिडिओत पाहायला मिळत आहेत. आता दोघेही म्हातारे झाले असले तरी जुन्या आठवणींना उजाळा देत एकमेकांना भेटले. लोक हा व्हिडीओ शेअर करत आहेत आणि आपल्या प्रतिक्रियाही देत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"