दात येत नाहीत, खाताना त्रास होतोय; दोन चिमुरड्यांचं थेट पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 02:34 PM2021-09-29T14:34:02+5:302021-09-29T14:34:34+5:30
लहानग्यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा
गुवाहाटी: आसामच्या दोन चिमुरड्यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. दात येण्यास खूप वेळ लागतोय. त्यामुळे आम्हाला खाताना त्रास होतोय. कृपया योग्य ती कार्यवाही करा, अशी विनंती दोघांनी पत्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्याकडे केली आहे. लहान मुलांनी अतिशय निरागसपणे त्यांची समस्या पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडे मांडली आहे.
सहा वर्षांची रईसा रावजा अहमद आणि पाच वर्षांचा आर्यन अहमद यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री सरमा यांना पत्र लिहिलं आहे. दोन्ही नेत्यांना स्वतंत्र पत्र पाठवण्यात आली आहेत. रावजा आणि आर्यन यांनी त्यांच्या दातांची समस्या पत्रातून मांडली आहे. 'आम्हाला आमचे आवडते खाद्यपदार्थ खाण्यात अडचणी येत आहेत. दुधाचे दात पडल्यानंतर नवे दात येण्यास बराच कालावधी लागत आहे. आमच्या समस्येकडे लक्ष द्या,' अशी मागणी दोघांनी पत्रातून केली आहे.
दोन चिमुरड्यांनी लिहिलेलं पत्र फेसबुकवर व्हायरल झालं आहे. मुलांचे काका मुख्तार अहमद यांनी हे पत्र शेअर केलं आहे. 'प्रिय मोदीजी, मला ३ दात येत नाहीएत. त्यामुळे चावताना अडचणी येत आहेत,' अशी व्यथा पत्रातून मांडण्यात आली आहे. कृपया आवश्यक कार्यवाही करा, अशी विनंती दोघांनी पत्रातून केली आहे. लहान मुलांनी लिहिलेल्या पत्राचं अनेकांनी कौतुक केलं आहे. मुलांनी पत्रात एक लहानसं चित्रदेखील काढलं आहे.