वर्गात मुली चिडवतात, रसगुल्ला, डांबर म्हणतात! वैतागलेल्या मुलांचं थेट मुख्याध्यापकांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 05:41 PM2022-05-11T17:41:27+5:302022-05-11T17:43:23+5:30
मुली दंगा करतात, खूप त्रास देतात, विचित्र नावांनी हाका मारतात; मुलांकडून तक्रारींचा पाऊस
शाळा, महाविद्यालयांमध्ये अनेकदा विद्यार्थ्यांची भांडणं होतात. चिडवाचिडवीचे प्रकार घडतात. विद्यार्थी एकमेकांची थट्टामस्करी करतात. ही मस्करी वाढली की मग पुढे वाद होतात. उत्तर प्रदेशच्या औरैयामध्ये असाच एक प्रकार घडला आहे. विद्यार्थ्यांनी केलेली तक्रार पाहून मुख्याध्यापकांना धक्का बसला आहे.
नवोदय विद्यालयात इयत्ता सातवीत शिकणाऱ्या मुलांनी वर्गातील मुलींची मुख्याध्यापकांकडे लेखी तक्रार केली आहे. वर्गातील मुली वेगवेगळ्या नावांनी मुलांना चिडवतात. कोणाला रसगुल्ला म्हणतात, तर कोणाला डांबर म्हणतात, अशा स्वरुपाची तक्रार मुलांनी केली आहे. मुलींनी याबद्दल मुलांची माफी मागावी, अशी मागणी मुलांनी पत्रातून केली आहे. मुलांनी मुख्याध्यापकांना लिहिलेलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
औरैया जवाहर नवोदय विद्यालयात सातवीत शिकत असलेल्या मुलांनी मुख्याध्यापकांना लिहिलेलं पत्र सध्या चांगलचं चर्चेत आहे. हे पत्र वाचून अनेकांना हसू आवरता आलेलं नाही. पत्र वाचून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. सातवी (अ)च्या मुलींनी मुलांची माफी मागावी, अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे.
पत्रात नेमकं काय?
'महोदय, आम्ही इयत्ता सातवी (अ)चे विद्यार्थी आहोत. आमच्याबद्दल बोलताना मुली वाईट शब्द वापरतात. उदाहरणार्थ- लल्ला, पागल, औकातीत राहा. मुली आम्हाला विचित्र नावानं हाका मारतात. अमिनेशला डांबर म्हणतात. अनमोलला रसगुल्ला म्हणतात. मुली वर्गात गोंधळ घालतात, गाणी गातात आणि डायलॉगबाजी करतात,' असं मुलांनी पत्रात नमूद केलं आहे. पत्रात त्यांनी गोंधळ घालणाऱ्या मुलींची नावंही लिहिली आहेत. जान्हवी, शिखा, ऋतू, काजल आणि अवनी या नावांचा पत्रात समावेश आहे.