रामराम! अनेकांनी दिलं राम मंदिरासाठी दान; पण 'हा' चेक ठरतोय सर्वाधिक चर्चेचा विषय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 12:12 PM2021-03-01T12:12:44+5:302021-03-01T12:17:09+5:30
ayodhya ram temple: राम मंदिरासाठी आतापर्यंत २१०० कोटींचं दान; निधी संकलन अभियानाची सांगता
नवी दिल्ली: अयोध्येतल्या भव्य राम मंदिरासाठी (Ayodhya Ram Mandir) गेल्या ४४ दिवसांपासून निधी गोळा केला जात आहे. काल (शनिवारी) निधी संकलन अभियानाची सांगता झाली. गेल्या दीड महिन्यांत अनेकांनी राम मंदिरासाठी यथाशक्ती दान केलं. त्यात सर्वसामान्यांपासून राजकारणातील अनेक दिग्गजांचा समावेश आहे. मात्र राम मंदिरासाठी एका व्यक्तीनं दिलेल्या २ लाख १४ हजार २१४ रुपयांच्या धनादेशाची सर्वत्र चर्चा आहे.
सोशल मीडियावर 'रामराम' म्हणून व्हायरल झालेल्या धनादेशामागे एक विशेष कारण आहे. राम मंदिरासाठी २ लाख १४ हजार २१४ रुपयांचं दान देणाऱ्या व्यक्तीनं धनादेशावर हा आकडा इंग्रजीत लिहिला आहे. हा आकडा (2,14,214) असा लिहिण्यात आला आहे की तो वाचताना देवनागरीत 'रामराम' असाही दिसतो. त्यामुळे धनादेश लिहिणाऱ्या सर्जनशीलतेचं अनेकांनी कौतुक केलं आहे.
214214/-में राम भक्त की राम राम pic.twitter.com/ju0SfG8Ik0
— मुकेश अग्रवाल (@Rashtradharam) February 28, 2021
पूर्ण झालं निधी संकलन अभियान; मंदिरासाठी २१०० कोटींचं दान
अयोध्येतल्या राम मंदिराच्या उभारणीसाठी हाती घेण्यात आलेल्या निधी संकलन अभियानातून २१०० कोटी रुपयांहून अधिकची रक्कम जमा झाल्याची माहिती विश्वस्त मंडळानं दिली. १५ जानेवारीला निधी संकलन अभियानाला सुरुवात झाली. तत्पूर्वी विश्वस्त मंडळानं ११०० कोटी रुपये जमतील असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र देशभरातून उत्स्फूर्त दान जमा झाल्यानं अपेक्षित रकमेच्या जवळपास दुप्पट रक्कम जमा झाली.
'राम मंदिरासाठी देशातल्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं दान केलं. यासाठी हाती घेण्यात आलेल्या अभियानाची आता सांगता झाली आहे. लोकांनी अतिशय उदार मनानं मंदिरासाठी सढळ हस्ते निधी दिला. शनिवारपर्यंत २१०० कोटी रुपयांचं दान जमा झालं,' अशी माहिची श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्तचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरींनी सांगितलं.