'बटोगे तो कटोगे',भाजपाच्या कार्यकर्त्यांने थेट लग्नपत्रिकेवरच सीएम योगींचा नारा छापला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 02:09 PM2024-11-10T14:09:15+5:302024-11-10T14:10:55+5:30
गुजरातमधील एका भाजपा कार्यकर्त्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा 'बटोगे तो कटोगे' हा नारा लग्नपत्रिकेवर छापला आहे.
हरयाणातील विधानसभा निवडणुकीच्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेला 'बटोगे तो कटोगे'चा नारा आता महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशात ज्या ९ जागांवर पोटनिवडणूक होत आहे त्यावर भाजपकडून हाच नारा दिला जात आहे. दरम्यान, गुजरातमधील एका भाजप कार्यकर्त्याने आपल्या भावाच्या लग्नाच्या लग्नपत्रिकेवर मुख्यमंत्री योगींनी दिलेला हा नारा छापला आहे. या कार्डचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातील महुवा तहसीलमधील वांगर गावात २३ नोव्हेंबरला भाजप कार्यकर्त्याच्या घरी हा विवाह होणार आहे. या लग्नाची खूप चर्चा सोशल मीडियावर आहे. वराच्या भावाने लग्नपत्रिकेवर सीएम योगींनी निवडणुकीत दिलेला नारा छापला आहे, यामध्ये हिंदू समाजाला एकत्र करण्याबाबत भाष्य केले आहे. सीएम योगी निवडणूक रॅलींमध्ये सतत नारे देत आहेत - 'बटोगे तो कटोगे', एकसंध राहाल तर एक राहाल.'
लग्नपत्रिकेवर मुख्यमंत्री योगींचा नारा छापल्यामुळे सगळीकडे चर्चा आहे. याबाबत भाजप कार्यकर्त्याने सांगितले की, लोकांना जागरूक करणे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश पोहोचवण्याच्या उद्देशाने लग्नपत्रिकेवर पंतप्रधान मोदी, योगी आदित्यनाथ आणि राम मंदिराचे चित्र तयार करण्यात आले आहे. या लग्नपत्रिकेत स्वच्छता अभियान आणि स्वदेशी अंगीकारण्यावरही भर देण्यात आला आहे.
काही दिवसापूर्वी झारखंडमध्ये एका सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री योगी म्हणाले होते, तुमची ताकद दाखवा, जातींमध्ये फूट पाडण्याची गरज नाही, काही लोक तुम्हाला जातीच्या नावावर विभागतील, काँग्रेस आणि विरोधक तेच करतात. ते घुसखोरांना बोलवत आहेत, एक दिवस ते तुम्हाला घराची घंटा देखील वाजवू देणार नाहीत,असंही योगी म्हणाले.