Beirut Blast: ड्युटी फर्स्ट! स्फोटांनी समोरच्या काचा फुटल्या; पण 'ती' नर्स तीन बाळांना घेऊन कामात व्यस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 05:09 PM2020-08-05T17:09:00+5:302020-08-05T17:12:39+5:30
Beirut Blast: कठीण परिस्थितीतही नर्सनं न डगमगता तिचं कर्तव्य बजावलं; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
बैरूत: लेबनॉनची राजधानी बैरुत काल दोन भीषण स्फोटांनी हादरली. यामध्ये १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून ४ हजार जण जखमी झाले आहेत. जखमींचा आकडा पाहता मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बैरुतमध्ये झालेल्या स्फोटांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओंमधून स्फोटांची तीव्रता लक्षात येते. आसपासच्या १० किलोमीटरपर्यंत स्फोटाचे आवाज ऐकू गेले. आसपास असलेल्या कित्येक किलोमीटरील घरांच्या काचा फुटल्या. छतांचं मोठं नुकसान झालं.
एका बाजूला बैरूतमधील स्फोटांची भीषणता दाखवणारे फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असताना दुसरीकडे या धडकी भरवणाऱ्या क्षणीदेखील काही जण अतिशय धीरादात्तपणे उभे राहिले. बैरूतमधल्या एका रुग्णालयातल्या नर्सचा असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या नर्सचं सर्वत्र कौतुक सुरू आहे. संकटाच्या काळातही न डमगमता काम करणाऱ्या या नर्सची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. बैरुत स्फोटांमधील सर्वात शक्तीशाली फोटो असं या फोटोचं वर्णन करण्यात आलं आहे.
This is a powerful picture.
— 𝐋𝐨𝐮 (@AlaaH28) August 5, 2020
A nurse, answering calls, holding 3 newborn babies in a hospital full of damage & glass and among dead bodies.
This breaks my heart. 💔#Beirut#prayforbeirut#LebanonExplosion#lebanon#علقوا_المشانق#كلن_يعني_كلن#لبنانpic.twitter.com/8woJjMuPd1
दोन जबरदस्त स्फोट झाल्यानं बैरुतमधील बहुतांश इमारतींच्या काचा फुटल्या. अवघ्या काही क्षणांत होत्याचं नव्हतं झालं. मात्र या परिस्थितीतही एक नर्स तिच्या कामापासून जराही विचलित झाली नाही. आजूबाजूला काचांचा खच पडला असताना, रुग्णालयाचं खूप नुकसान झालं असतानाही नर्स अतिशय शांतपणे तिचं काम करत होती. त्या नर्सच्या हातांमध्ये तीन तान्ही बालकं होती. तिनं खांद्याचा आधार घेऊन लँडलाईन फोन धरला होता. त्यावरून ती समोरच्या व्यक्तीशी संवाद साधत होती. संकट काळातही आपलं काम अत्यंत चोख बजावणाऱ्या या नर्सचा फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
मंगळवारी बैरुत दोन शक्तिशाली स्फोट झाले. जवळपास १० किलोमीटर अंतरावर स्फोटाचे धक्के जाणवले. स्फोटामुळे कित्येक इमारतींचं नुकसान झालं. अनेकांच्या घराच्या काचा फुटल्या. स्लॅबचे काही भाग कोसळले. त्यामुळे नागरिक जखमी झाले. या नागरिकांना आसपासच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र जखमींची संख्या ४ हजारांहून अधिक असल्यानं शहरातील रुग्णालयं कमी पडली.