जीवाची पर्वा न करता लेकरांसाठी ढाल बनली आई; Video पाहून तुमच्या अंगावर शहारा आल्याशिवाय राहणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 12:48 PM2023-12-25T12:48:46+5:302023-12-25T12:50:05+5:30
अंगावरून रेल्वे जात असताना या आईनं प्राणाची बाजी लावून आपल्या दोन लेकरांना वाचवलं...
Viral Video: रेल्वे प्रवासादरम्यान दरवाजाला टेकून उभे असताना, खांबाला धडकून किंवा ट्रेन पकडताना दुर्घटना होत असतात. काही वेळा प्रवाशांना या अशा दुर्घटनांमध्ये प्राणाला मुकावे लागते, तर काहीवेळा नशीब बलवत्तर असल्यामुळे प्रवाशी बचावतात. अशाच एका रेल्वेमधील घटनेचा व्हिडीओ नुकताच समोर आला आहे.
सध्या सोशल मीडियावर आईच्या निस्वार्थ प्रेमाची प्रचिती देणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ही घटना बिहारमधील बाढ रेल्वे स्थानकावरील असल्याचे बोलले जात आहे. हा व्हिडीओ पाहून कुणाच्याही अंगावर शहारा आल्याशिवाय राहणार नाही.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एका महिलेने आपल्या मुलांचे संरक्षण करण्यासाठी केलेली धडपड पाहून नेटकरी भावूक झाले आहेत. धावत्या रेल्वेच्या कचाट्यातून तिने मुलांची सुखरूप सूटका केल्याचे या व्हिडिओतून दिसत आहे. आपल्या आईसोबत ही दोन मुले ट्रेनने प्रवास करत होती. यावेळी रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने महिला तिच्या दोन मुलांसह पाय घसरुन रुळावर पडली. त्याच क्षणी समोरुन भरधाव वेगात ट्रेन येत होती. अशा वेळी रेल्वे रुळावर पाय घसरून पडलेल्या मुलांचा जीव वाचवण्याचे आव्हान या महिलेपुढे होते. आपल्या लेकरांचा मृत्यू आपल्या डोळ्यांसमोर होईल की काय? अशी भीती या मातेला सतावत होती.
मिळालेल्या माहितीनुसार,रेल्वे स्थानकावर उपस्थित असलेले लोक मदतीला धावतील तेवढ्यात ट्रेन आली. अशा परिस्थितीत आपल्या लेकरांना उदराखाली घेत या महिलेने शरीराची ढाल बनवून लेकरांचे रक्षण केले. रेल्वे आणि महिलेमध्ये अगदी काहीच इंचाचे अंतर असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. काळजाची धडकी भरवणारा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी या महिलेवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ज्या क्षणी रेल्वे फलाट सोडून पुढे मार्गस्थ झाली, तेव्हा रेल्वे स्थानकावरील लोक या महिलेच्या मदतीसाठी पुढे सरसावले.
पाहा व्हिडीओ -
मौत के सामने जीती मां की ममता. #Bihar के #Barh रेलवे स्टेशन से वीडियो. भीड़ में मां, दो बच्चों संग पटरी पर गिरी. ट्रेन चलने लगी. 3 जिंदगियों के सामने मौत खड़ी थी. और दूसरी तरफ मां. उधर ट्रेन की रफ्तार थी. तो इधर मां की ममता. 25 सेकेंड बाद मां जीती. मौत हारी. #viralvideo#barhpic.twitter.com/bsDxbD0EFS
— Sunil Maurya (@smaurya_journo) December 24, 2023